
>> नीलांबरी जोशी
‘पबजी’ खेळल्यामुळे मुलांच्या शारीरिक, मानसिक आरोग्यावर दुष्परिणाम होतात. त्यांना या गेमचं व्यसन लागू शकतं आणि त्यांची प्रवृत्ती हिंसक बनते. यासाठी ‘पबजी’वरच्या बंदीची मागणी पुढे येते आहे. या सगळ्या आरोपांमध्ये कितपत तथ्य आहे हे पहायला गेलं तर ‘इंटरनेट गेमिंग’ला ‘जागतिक आरोग्य संघटने’नं नुकतंच मनोविकार म्हणून घोषित केलं आहे.
पबजी लाईट’ हे पबजीचं नवीन व्हर्जन हिंदुस्थानात 4 जुलैला सुरू झालं. आजपर्यंत फक्त इंग्रजी भाषेत उपलब्ध असलेला हा व्हिडीओ गेम आता हिंदी भाषेतही सुरू होणार आहे. याच पबजीनं हिंदुस्थानभरातल्या लोकांसाठी मोबाईलवरून हा गेम खेळण्याची नवीन स्पर्धा जाहीर केली आहे. त्या स्पर्धेत जिंकलं तर बक्षिसाची रक्कम चक्क दीड कोटी रुपये आहे. त्यामुळे हा गेम खेळणाऱया स्पर्धकांची संख्या भरमसाट वाढेल. हिंदुस्थानात 30 लाख मुलं दररोज हा गेम खेळतात असं आकडेवारी सांगते. हे गेम खेळणाऱया 1/3 व्यक्तींना त्याचं व्यसन लागू शकतं असं तज्ञ सांगतात.
त्याचं हे एक वेगळंच उदाहरण. ‘त्याचं काय आहे ना.. मला पबजी खेळायला खूप आवडतं. त्यातल्या माझ्या पार्टनरबरोबर मला लग्न करायचं आहे.. त्यासाठी मला माझ्या नवऱयापापासून घटस्फोट हवा आहे..!’ गुजरातमध्ये स्त्रियांना मदत करणाऱया 181 या हेल्पलाइनवर आलेला हा फोन.. आपल्या मुलांच्या पबजीच्या व्यसनाबद्दल फोन करणारे लोक या हेल्पलाइनला सवयीचे होते.. पण बिल्डिंग कॉण्ट्रक्टरशी लग्न झालेल्या आणि एका मुलाची आई असलेल्या एका 19 वर्षांच्या तरुणीचा तो फोन ऐकून समुपदेशकही चक्रावले. तिला मानसोपचारतज्ञांनी आता व्यसनमुक्तीचे प्रयत्न करायचा सल्ला दिला आहे.
अशाच प्रकारे हैदराबादमधल्या एका नववीतल्या मुलाला लागलेलं ‘पबजी’चं व्यसन सोडवण्यासाठी एका मानसोपचारतज्ञाला त्याला औषधं द्यावी लागली. त्यानंतर हिंदुस्थानात ‘पबजी’वर बंदी आणावी अशा मागण्या सुरू झाल्या आहेत. गुजरातमध्ये ‘पबजी’वर बंदी आल्यामुळे राजकोटमधल्या पोलिसांनी कॉलेजच्या 10 विद्यार्थ्यांना स्मार्टफोन्सवर ‘पबजी’ खेळताना नुकतंच पकडलं होतं. पबजी-प्लेयर अननोन्स बॅटलग्राऊंड’ हा गेम ‘ब्लू होल’ या साऊथ कोरियन कंपनीनं 20 डिसेंबर 2017 रोजी बाजारात आणला. जून 2018 पर्यंत जगभरात 40 कोटी प्लेयर्स हा गेम खेळत होते.
‘पबजी’ खेळल्यामुळे मुलांच्या शारीरिक, मानसिक आरोग्यावर दुष्परिणाम होतात. त्यांना या गेमचं व्यसन लागू शकतं आणि त्यांची प्रवृत्ती हिंसक बनते यासाठी ‘पबजी’वरच्या बंदीची मागणी पुढे येते आहे. या सगळ्या आरोपांमध्ये कितपत तथ्य आहे हे पहायला गेलं तर ‘इंटरनेट गेमिंग’ला ‘जागतिक आरोग्य संघटने’नं नुकतंच मनोविकार म्हणून घोषित केलं आहे. कम्प्युटर किंवा व्हिडीओ गेम्स खेळताना व्यक्तीच्या इच्छाशक्तीचा ताबा सुटणं, त्यानं/तिनं सतत तो गेम खेळणं आणि त्यातून त्या व्यक्तीच्या शारीरिक/मानसिक आरोग्यावर परिणाम होणं म्हणजे ‘इंटरनेट गेमिंग डिसऑर्डर’ पण याला मनोविकार मानावं का नाही याबद्दल मानसिक आरोग्याच्या क्षेत्रातल्या तज्ञांमध्ये वाद आहेत. त्यामुळेच मनोविकारांच्या वर्गीकरणाबाबत प्रमाण समजल्या जाणाऱया ‘अमेरिकन सायकीऑट्रिक असोसिएशन’च्या 2013 सालच्या ‘डायग्नोस्टिक्स ऍण्ड स्टॅटिस्टिकल मॅन्युअल – डीएसएम-5’ मध्ये ‘इंटरनेट गेमिंग डिसऑर्डर’ हा मनोविकार म्हणून दाखल होण्याआधी यावर वैद्यकीय संशोधन व्हायला हवं असा उल्लेख आहे. मात्र त्यालाही आता 6 वर्षे उलटून गेली आहेत. तंत्रज्ञानाच्या वेगाचा झपाटा पहाता इंटरनेट गेमिंगमध्येही चिक्कार बदल झाले आहेत. आज जगात 230 कोटी लोक व्हिडीओ गेम्स खेळतात. त्यापैकी 110 कोटी म्हणजे 46 टक्के लोक त्यावर पैसे घालवतात. गेमिंगची बाजारपेठ 2018 साली 13790 कोटी डॉलर्सची होती. त्यापैकी एकटय़ा चीनमधलीच उलाढाल 344 कोटी डॉलर्सची आहे.
त्यातही धोकादायक बाब म्हणजे शाळा-कॉलेजमधले विद्यार्थी व्हिडीओ गेम्सची शिकार बनण्याचं प्रमाण सर्वात जास्त आहे. त्यांच्या मेंदूच्या रचनेवर व्हिडीओ गेम्समुळे/स्क्रीन असलेली उपकरणं वापरून परिणाम होतो. दिवसाला 2 तासांपेक्षा जास्त वेळ स्क्रीनसमोर घालवणाऱया मुलांचे भाषा आणि इतर विषयांमधले मार्क खालावतात. दिवसाला सात तासांपेक्षा जास्त या उपकरणांवर घालवणाऱया मुलांच्या मेंदूच्या रचनेवर याहून गंभीर परिणाम होतात. हिंसात्मक आणि आक्रमक प्रवृत्ती वाढणं, हिंसेबाबत संवेदनशीलता कमी होणं, नैराश्य वाढणं, वर्णभेद मनावर बिंबणं, झोपेचं चक्र बिघडणं हे परिणाम अनेक निरीक्षणांनुसार समोर आले आहेत.
याबाबतीत एक प्रश्न मनात उभा राहतो. तो म्हणजे अगदी प्राचीन काळापासून खेळ खेळणं हा आयुष्यातला गरजेचा आणि दैनंदिन भाग होता. नावीन्यपूर्ण गोष्टींचा शोध घेणं, विचारक्षमता वाढवणं, ताण हलका करणं आणि पालक/इतर मुलं यांच्याबरोबर एक बंध जोडला जाणं हे खेळातूनच मुलांसाठी साध्य होतं. आपल्याला आयुष्यात जे बनावंसं वाटतं ती पात्रं रंगवण्याचा खेळ जवळपास आपण सर्वजण खेळत आलो आहोत. सामाजिक पातळीवर सहकार्य आणि संवादकौशल्य वाढवायलाही खेळाची मदत होते. साहसी खेळांमधून भीती कमी होऊ शकते. खेळाला मानसिक, सामाजिक आणि सांस्कृतिक पातळ्यांवर खूप महत्त्व आहे. त्यामुळेच जर एखाद्या लहान मुलाला खेळ खेळणं जमत नसेल तर ‘त्याला वाढीच्या वयातले विकार आहेत का?’ असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो इतकं अनन्यसाधारण महत्त्व खेळण्याला आहे, पण गेल्या काही दशकांत भरमसाट वाढलेल्या ऑनलाइन सोशल गेमिंगमध्ये माणसं हा खेळ समस्या किंवा मनोविकार वाटावा इतका वेळ खेळत आहेत.
‘इंटरनेट गेमिंग डिसऑर्डर’ची कारणं शोधायला गेलं तर महत्त्वाचं म्हणजे वास्तवापासून दूर पळणं. वेगवान बनलेल्या वास्तव आयुष्यातली शारीरिक/मानसिक/सामाजिक जीवनातली धावपळ कित्येक जणांना नको वाटते. मुलांना आणि तरुण लोकांना शिक्षणातल्या भयंकर वाढलेल्या स्पर्धेला तोंड द्यावं लागतं. वृद्धांपुढे एकाकीपणापासून अल्झायमरपर्यंत अनेक समस्या आहेतच.
मग अनेकदा वेळ घालवण्यासाठी आणि रोजच्या कटकटींमधून सुटका म्हणून हे गेम्स खेळले जातात. या गेममध्ये खेळणाऱयांना तुम्ही प्रत्यक्ष जीवनात ओळखत असताच असं नाही. तिथे एका वेगळ्या प्रकारच्या व्हर्च्युअल-आभासी समाजाशी नातं जोडलं जातं. हे आभासी जगच गेम्स खेळणाऱयांना खरं वाटायला लागतं. प्रत्यक्ष आयुष्यातल्या गोष्टींपेक्षा आभासी जगातले लाईक्स, क्लिक्स यांचं मोल जास्त वाटायला लागतं. आयुष्याचा खेळ इतका सहजसाध्य नाही हे मात्र यात विसरलं जातं.
[email protected]





























































