
सामना प्रतिनिधी । मुंबई
मुंबईसह कोकण व आसपासच्या भागात मुसळधार पावसाला सुरुवात झाली असली तरी राज्याच्या ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पावसाने ओढ दिल्याने आजही पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या चार्यांचा प्रश्न गंभीर आहे. त्यामुळे राज्यात सुरू केलेल्या चारा छावण्या 1 ऑगस्टपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय राज्याच्या महसूल व वन विभागाने घेतला आहे. राज्यात सध्या एक हजारांहून अधिक चारा छावण्या सुरू असून या चारा छावण्यांवर दररोज सरासरी 10 कोटी रुपये खर्च होत आहेत.
राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे जनावरांच्या चारा छावण्या सुरू करण्यात आल्या. सुरुवातीला या चारा छावण्या जून महिन्यापर्यंत सुरू करण्याचा निर्णय झाला होता. पण पावसाला झालेला विलंब परिणामी जनावरांना चारा उपलब्ध होण्यासाठी लागणारा वेळ लक्षात घेऊन 1 ऑगस्टपर्यंत चारा छावण्या सुरू ठेवण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीने घेतला आहे. त्यासंदर्भातील शासन निर्णय आज जाहीर झाला.
चार्यांवर दररोज 10 कोटी खर्च
त्यानुसार राज्यात सध्याच्या घडीला सुमारे 1 हजार 417 चारा छावण्या सुरू असून या छावण्यांमध्ये दहा लाखांच्या आसपास मोठी जनावरे म्हणजे गाई-म्हशी, बैल, रेडे अशी जनावरे आहेत. एका मोठय़ा जनावराच्या मागे 70 रुपये व शेळ्या-मेंढय़ांसारख्या लहान जनावरांच्या मागे 35 रुपये राज्य सरकार खर्च करीत होते. नंतर ही रक्कम वाढवण्यात आली. मोठय़ा जनावरासाठी 90 तर लहान जनावरांसाठी 45 रुपये देण्याचा निर्णय झाला. पण जनावरांसाठी वैरण खरेदी, त्यावरील वाहतुकीचा खर्च लक्षात घेऊन 15 मे रोजी ही रक्कम वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार प्रत्येक मोठय़ा जनावरासाठी 100 रुपये व लहान जनावरासाठी 50 रुपये देण्यास आता सुरुवात झाली आहे.























































