
सामना प्रतिनिधी। मुंबई
वृद्धांचे दागिने चोरणाऱया दोघा सोनसाखळी चोरांनी नवघर परिसरात धुमाकूळ घातला होता. चोरटे नेहमीच पोलिसांना चकवा देऊन पसार व्हायचे. मात्र गेल्या आठवडय़ात ते गस्तीवरील नवघर पोलिसांच्या नजरेस पडले. मग त्यांना पकडण्यासाठी सुरू झाला चित्तथरारक पाठलाग. जिवाची पर्वा न करता एका महिला कॉन्स्टेबल आणि सहाय्यक निरीक्षकाने आधी गाडीने मग धावत पाठलाग करून दोन्ही चोरांच्या मुसक्या आवळण्याची धाडशी कामगिरी केली.
दोघा सोनसाखळी चोरांनी नवघर परिसरात धुमाकूळ घातला होता. त्यामुळे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक थोरवे आणि महिला पोलीस कॉन्स्टेबल वंदना केदारे हे दोघे पोलिसांच्या चारचाकी गाडीवरून मुलुंड पूर्वेकडील परिसरात गस्त घालत होते. तेव्हा एका दुचाकीवरून आलेल्या दोघा तरुणांची हालचाल थोरवे यांना संशयास्पद वाटली. त्यामुळे केदारे यांनी त्या दोघांकडे गाडी नेली. पोलिसांची गाडी आपल्या दिशेने येत असल्याचे पाहून त्या दोघांनी तेथून पळ काढला. ते दोघे चोरच असणार हे स्पष्ट होताच पोलिसांनी त्यांचा पाठलाग सुरू केला.
फुटपाथवर दुचाकी चढवली
टाटा कॉलनीजवळ प्रचंड ट्रॅफिक असल्याने चोरांनी फुटपाथवर दुचाकी चढवली आणि पळू लागले. तेवढय़ात थोरवे यांनी गाडी बाहेर येऊन एका चोरावर झडप घातली, मात्र दुसरा चोरटा दुचाकी सोडून पळून लागला.
बघे मुंबईकर मात्र एन्जॉय करत होते
एक चोरटा हाती लागला, पण दुसऱयालाही पकडणे महत्त्वाचे होते. त्यामुळे केदारे यांनी गाडीबाहेर येऊन ‘चोर चोर पकडा’ अशी आरडाओरड सुरू केली. रस्त्यावर लोक होते, पण सर्वांनी बघ्याची भूमिका घेतली होती. त्यामुळे वंदना केदारे यांनी स्वतःच त्या चोराचा पाठलाग सुरू केला. काहीही करून त्याला पकडायचेच अशी खुणगाठ बांधून केदारे सरसावल्या. मदतीचा हात देण्याऐवजी हा पाठलाग बघे मुंबईकर मात्र एन्जॉय करीत होते. अखेर काही अंतर पाठलाग केल्यानंतर वंदना केदारे यांनी त्या चोरावर झडप घातली.
चकवा देण्याचा प्रयत्न केला, पण…
चोरटे कशाही कट वगैरे मारत दुचाकी दामटवत होते. तर केदारे पोलिसांची गाडी त्यांच्याच मागे नेत होत्या. चोरांनी पोलिसांना गल्लीबोळातून फिरवत चकवा देण्याचा प्रयत्न केला. पण केदारे व थोरवे यांनीदेखील हार मानली नाही. पोलिसांनी त्यांना जाऊ दिले नाही. चोर पुढे पोलीस मागे असे चित्र रस्त्यावर होते.



























































