महाराष्ट्रात 415 आयएएस, 317 आयपीएस अधिकारी; दोन वर्षात पदांमध्ये लक्षणीय वाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली

महाराष्ट्रात प्रशासकीय आणि सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या हिंदुस्थानी प्रशासकीय सेवेचे (आयएएस) 415 आणि हिंदुस्थानी पोलीस सेवेचे (आयपीएस )317अधिकारी सद्य:स्थितीत कार्यरत आहेत.

गेल्या वर्षी घेण्यात आलेल्या आढाव्यानुसार 2016 ते 2018 या कालावधी दरम्यान महाराष्ट्रातील आयएएस व आयपीएस अधिकाऱ्यांच्या पदांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. राज्यात आयएएस अधिकार्‍यांची संख्या 361 हून वाढून 415 झाली आहे तर आयपीएस अधिकार्‍यांची संख्या 302  हून वाढून 317 झाली आहे.  प्रधानमंत्री कार्यालय तथा कर्मचारी, जनतक्रार आणि निवृत्ती वेतन विभागाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी राज्यसभेत लिखित उत्तरात ही माहिती दिली .

केंद्र शासनाकडून दर पाच वर्षांनी राज्यांच्या आवश्यकतेनुसार उपलब्ध करून देण्यात आलेल्या देशातील आयएएस आणि आयपीएस अधिकार्‍यांच्या पदांचा आढावा घेण्यात येतो. याअंतर्गत वर्ष 2016 ते 2018 दरम्यान देशातील एकूण 10 राज्यांचा आढावा घेण्यात आला असून या राज्यांमध्ये एकूण 2 हजार 710 आयएएस अधिकारी असल्याची माहिती आहे. या आढाव्यामध्ये महाराष्ट्रातील आयएएस अधिकार्‍यांच्या संख्येत 361 हून 415 एवढी वाढ झाल्याचे चित्र आहे.

वर्ष 2016 ते 2018 दरम्यान केंद्रीय गृह मंत्रालयासह देशातील एकूण 13 राज्यांमधील आयपीएस अधिकार्‍यांच्या पदांचा आढावा घेण्यात आला असून या राज्यांमध्ये एकूण 2 हजार 277आयपीएस अधिकारी आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील आयएएस अधिकाऱ्यांच्या संख्येत 302 वरुन 317 एवढी वाढ झाली  आहे.