व्याघ्र प्रकल्पाची वाटचाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अनिरुद्ध चावजी

शेतीसाठी जमिनी पादाक्रांत करण्यात आल्यामुळे पूर्वी सलग एकसंध असलेल्या अरण्याचे तुकडे पडले आणि या सगळ्या घडामोडींमुळे सगळ्यात जास्त आपत्ती जर कोणा एका प्राण्यावर ओढवली असेल तर तो म्हणजे वाघ. वाघाला गरज असते सुदृढ, निरोगी जंगलाची आणि तितक्याच निरोगी धडधाकट शिकारीची, त्याच्या खाद्याची. विकासाच्या शर्यतीत धावताना आपण हे विसरून गेलो की मनुष्य आणि वाघ यांचं सहजीवन अशक्य आहे. एकाच्या अस्तित्वासाठी दुसऱयाचा बळी जाणारच आणि मग शहरीकरणाच्या वावटळीत वाघांचे अस्तित्व जवळजवळ मिटल्यातच जमा झाले.

संध्याकाळची उशिराची वेळ. सूर्य वेगाने मावळतीच्या दिशेला चालला होता. उन्हाळ्याचे दिवस असल्याने सूर्यास्तानंतरही कोणाचीही धूसर आकृती दिसेल इतपत उजेड मेळघाटच्या जंगलात अजूनही घोटाळत होता. तेवढय़ात मला एक वाघ पाणतळ्याच्या दिशेने दिमाखात चालत येताना दिसला. माझ्याबरोबर असलेल्या साथीदारांच्या मनातली चलबिचल मला जाणवली. आपली अस्त्र पारजून योग्य क्षण गाठण्यासाठी ते सरसावून सज्ज होत होते.

नेमका निशाणा साधायचा होता. सावध झाला तर हा वाघ दुसरी संधी देणार नाही. त्याच्या पाणी पिण्याच्या आवाज आसमंतात भरून गेला होता. आणि मला एकाच वेळी बरीच “क्लिक’’ “क्लिक’’ कानावर आली त्यापाठोपाठ … “मिळाला!’’ अशी उत्साहातली कुजबुज. या अशा रोमांचक संध्याकाळी अशा तऱहेने व्याघ्रदर्शन झाल्यावर पाणतळ्यावर पाणी पिणाऱया वाघाचे अप्रतिम फोटो मिळतील एवढी माझ्या त्या साथीदारांची माफक अपेक्षा.

पण आपण साधारण 40-45 वर्षं मागे गेलो तर आताच्या परिस्थितीपेक्षा थोडं वेगळं चित्र आपल्याला दिसलं असतं. “क्लिक’’ क्लिक ऐकू आली असती, पण ती लांब पल्ल्याच्या बंदुकींच्या खटक्याची! आपल्या कॅमेऱयांनी आणि झूम लेन्सेसनी वन्यजीवन चित्रित करणाऱया आजच्या तरुण पिढीला हे हास्यास्पद किंवा लाजिरवाणं वाटेल, परंतु साधारण 1970 च्या आधीच्या काळात हिंदुस्थान देश प्रसिद्ध होता एक शिकारीचं ठिकाण म्हणून. इथल्या वन्यजीवनाचे उत्तमोत्तम फोटो घेण्यापेक्षा शिकारीतून मिळवलेली वन्य प्राण्यांची कातडी, त्यांची शिंग किंवा मुंडकी वापरून आपला दिवाणखाना सजवून आपली बहाद्दुरी दाखवण्यात लोकांना अधिक रस होता.

स्वातंत्र्योत्तर काळात कृषी आणि उद्योग क्षेत्रात आत्मनिर्भर होण्यासाठी केलेल्या गतिमान ‘प्रगती’चे आपण साक्षीदार आहोतच. शहरीकरणाकडे वाटचाल करण्यासाठी जंगलाचे लांबच लांब पट्टे नष्ट करण्यात आले. शेतीसाठी जमिनी पादाक्रांत करण्यात आल्यामुळे पूर्वी सलग एकसंध असलेल्या अरण्याचे तुकडे पडले आणि या सगळ्या घडामोडींमुळे सगळ्यात जास्त आपत्ती जर कोणा एका प्राण्यावर ओढवली असेल तर तो म्हणजे वाघ. शहरीकरणाच्या वावटळीत वाघांचे अस्तित्व जवळजवळ मिटल्यातच जमा झाले.
1972 त्या पहिल्यावहिल्या राष्ट्रीय व्याघ्रगणनेने मात्र देशातील निसर्गप्रेमी लोकांना धक्का बसला. त्यांची झोप उडवली. शतकाच्या सुरुवातीला केलेल्या अंदाजानुसार वाघांची संख्या 40,000 च्या आसपास होती. आता मात्र हिंदुस्थानात मोजकेच निव्वळ 1800 वाघ शिल्लक राहिले होते. इतके दिवस वाघांच्या नायनाटाकडे आपण फक्त उघडय़ा डोळ्यांनी बघत राहण्याचे काम केले होते.

व्याघ्र प्रकल्प
रॉयल बेंगॉल टायगरची प्रजाती हिंदुस्थानी जंगलांमधून समूळ नष्ट होणार हे आतापर्यंत जवळजवळ निश्चितच झालं होतं, पण नशिबाने जगभरातील वन्यजीवप्रेमींच्या दबावामुळे आणि मुख्यत्वेकरून हिंदुस्थानला इंदिरा गांधींच्या रूपात निसर्गप्रेमी पंतप्रधान म्हणून लाभल्यामुळे रॉयल बेंगॉल टायगर आपलं अस्तित्व टिकवून राहिला. त्याच सुमारास 1950 पर्यंत जगाने कॅस्पियन टायगरला गमावले होते. दक्षिण चीनमधील वाघ नाहीसे होण्याच्या मार्गावर होतेच. 1937 नंतर शेवटचा बालीनीज टायगर दिसेनासे झाले होते. 1972 मध्ये ज्या वेळेला हिंदुस्थानातील वाघांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले जात होते त्याच सुमारास जगाच्या नकाशावरून जावन् टायगर्स गायब झाले होते आणि या पार्श्वभूमीवर फक्त हिंदुस्थानच वाघांना वाचवण्याची कामगिरी करू शकला होता. पर्यावरणाचा समतोल राखत वाघांच्या संवर्धन आणि संरक्षणासाठी पंतप्रधान इंदिरा गांधींनी तातडीने एका विशेष कार्य समितीची स्थापना केली. आणि लवकरच 1973 मध्ये हिंदुस्थानभरातील निवडक नऊ राष्ट्रीय अरण्यांमध्ये प्रतिष्ठत व्याघ्र प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली. या प्रकल्पाच्या माध्यमातून वाघांच्या संवर्धनासाठी पूर्णपणे सुरक्षित कोअर एरिया आणि त्याच्याभोवतीचा बफर झोन अशी जंगलाची विभागणी करण्यात आली. बफर झोनमधल्या जागेचा वापर काही ठरावीक कामांसाठी करण्याची परवानगी देण्यात आली.

त्याच वेळेला जंगलांची वाईटरीत्या झालेली नासधूस भरून काढण्यासाठी आणि वाघांचा रहिवास सुधारण्यासाठी कामही हातात घेण्यात आले. वर्ल्ड वाइल्ड लाइफ फंड म्हणजे आताच्या वर्ल्ड वाइड फंड फॉर नेचरच्या माध्यमातून केंद्र सरकारने या कामासाठी भरघोस अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले. काम सुरू करण्यात आलेल्या नऊ व्याघ्र प्रकल्पांच्या जंगलांचा सुधारलेला दर्जा आणि त्याचाच परिपाक म्हणून वाघांच्या संख्येत झालेली वाढ हे या प्रकल्पाची मोठी वाखाणण्याजोगी कामगिरी म्हणावी लागेल. काळाच्या ओघात व्याघ्र प्रकल्पांच्या संख्येत भर पडली आणि वाघ सोडून इतर वन्य जीवांसाठीदेखील चांगले दिवस आले.

वाघ हे अन्नसाखळी मधल्या सर्वोच्च स्थानावर असल्याने त्यांची संख्या हेच जंगलाच्या आरोग्याचं द्योतक ठरते या साध्या तथ्यावरच व्याघ्र प्रकल्पाची आखणी करण्यात आली होती. वाघ वाचवण्यासाठी जंगलाचं आरोग्य सुधारणं गरजेचं. बरीचशी जंगलं ही काही महत्त्वाच्या नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात येतात हे लवकरच लोकांच्या लक्षात येऊ लागलं. याचा अर्थ ह्या पाण्याच्या संवर्धनासाठी आणि म्हणूनच कृषी स्वातंत्र्यासाठी वाघ वाचवणं गरजेचं आहे. आणि मग पाठोपाठ त्या वर्षांमध्ये अनेक राष्ट्रीय अरण्ये आणि त्यांना जोडून असलेली जंगले यांचा आधी निवडलेल्या जंगलांच्या बरोबरीने व्याघ्र प्रकल्पात समावेश करण्यात आला. जेमतेम 1800 त्या आकडय़ावरून वाघांच्या संख्येत कमालीची वाढ झाली. व्याघ्रगणनेत 4000 वाघ आहेत त्यानंतरच्या पंचवार्षिक योजनेत सरकारने कोअर आणि बफर झोन मध्ये वाढ करून शिवाय नवीन जंगले व्याघ्र प्रकल्पाशी निगडित करून या प्रकल्पाची व्याप्ती अजूनच वाढवली. त्याचबरोबर जोडीला संरक्षण सुविधा आणि संशोधनावरही जोर देण्यात आला.

प्रकल्पाच्या यशातले चढउतार
देशातील निसर्गप्रेमींना हा प्रकल्प यशस्वी करणे म्हणजे शिवधनुष्य उचलण्याइतके कठीण काम होते आणि तो काही दशकांपूर्वी असाधारण वाटणारा उपक्रम आता सिद्धीस गेला होता. मात्र यानंतर पुन्हा वाघांच्या पुन्हा एकदा कमी होऊ लागलेल्या संख्येबाबत चिंतेचा सूर उमटू लागला. सरिस्का, पन्ना आणि नामदाफाच्या जंगलांमध्ये एकही वाघ आढळून आला नव्हता. तिथली वाघांची संख्या शून्य असल्याच्या बातमीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. बेकायदेशीर शिकाऱयाच्या रूपातल्या राक्षसांनी देशाला हादरवून टाकले. वाइल्ड लाइफ इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाच्या आकडेवारीनुसार वाघांच्या संख्येत पूर्वीच्या आकडय़ांपेक्षा अधिक घट झाली होती. यावेळचं संकट अधिकच तीव्र होतं. फक्त 1400 च वाघ शिल्लक राहिले होते. सरकारने परत एकदा कंबर कसली. परंतु या संकटामुळे काही चांगले बदल घडले. वन खात्याला उरल्यासुरल्या वनसंपत्तीचे रक्षण करण्याचे आदेश देण्यात आले, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आणि नवीन व्याघ्र प्रकल्पांची घोषणा करण्यात आली.

या हालचालींचा महाराष्ट्रालाही फायदा झाला. घनदाट पश्चिम घाटात असलेल्या कोयना आणि चांदोली धरणांच्या बाजूलाच सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली. इथल्या कास पठारावरील पुष्पवैविध्यामुळे ‘युनेस्को’चा वर्ल्ड हेरिटेज साइट दर्जा प्राप्त झाला आहे.

आज लोकसंख्येची बेसुमार वाढ होत असताना वाघ आणि इतर वन्य जीवांबाबत अधिक जागृकतेने बघण्याची गरज आहे. वाघांची संख्या जोपासण्यासाठी व्याघ्र प्रकल्प महत्त्वाचे यात शंकाच नाही, पण या निर्माण केलेल्या संवर्धित जंगलांची बेटं न बनता त्यांच्यामध्ये चलनवलनाचे मार्ग तयार करायला हवेत. नाहीतर INBREEDING मुळे अनुवंशिक दोष असलेले वाघ जन्माला येण्याची भीती वाढेल. महाराष्ट्रातील पूर्व भागातील जंगले आणि पश्चिम घाटातील जंगलांमध्ये वाघ अजूनही तळ ठोकून किल्ला लढवत आहेत. या वसुंधरेला चांगलं आयुष्यमान देण्याची मनुष्याची इच्छा असेल तर चांगली जंगले आणि त्यातील मौल्यवान जलाशय वाचायलाच हवेत.

(लेखक ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात बायोलॉजिस्ट आहेत.)

[email protected]