
सामना प्रतिनिधी । अलिबाग
अलिबाग जिल्ह्यात रोहा तालुक्यात वरसगाव तलावात एक तर पेण तालुक्यात अंबा नदीत एक असे वेगवेगळ्या ठिकाणी दोन जण बुडल्याची घटना रविवारी दुपारी घडली आहेत. आशिष शेफूड (40, रा. महादेव वाडी, धाटाव, रोहा) व रवी चव्हाण (40, रा. चुनाभट्टी, मुंबई) अशी बुडालेल्याची नावे आहेत. या दोघांचा शोध पोलिस व स्थानिक ग्रामस्थांमार्फत सुरू आहे. जिल्ह्यात दोन दिवसात एकूण सात जण बुडाले आहेत.
रोहा तालुक्यातील कोलाड येथील आशिष सीताराम शेफुडे हे वरसगाव येथे तलावात मित्रांसोबत पोहण्यास गेले होते. त्यावेळी पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडाले. रवी चव्हाण हे आपल्या मित्रांसोबत निगडे येथे फिरण्यास आले होते. त्यावेळी निगडे गावात असलेल्या नदीत रवी चव्हाण हे पोहण्यास गेले असता वाहून गेले. निगडे गावचे ग्रामस्थ, पोलिस पाटील,यांचे मदतीने वडखळ पोलीस शोध घेत आहोत.आपत्ती व्यवस्थापन यांच्या मदतीने शोध घेतला परंतु अद्यापपर्यंत शोध लागलेला नाही. जिल्ह्यात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस असून जिल्ह्यातील नदी, मोऱ्या यांची पातळी वाढली आहे. जिल्ह्यात दोन दिवसात सात जण बुडल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यापैकी पाच जणांचे मृतदेह सापडले आहेत.


























































