
सामना प्रतिनिधी । पणजी
गोवा येथील भाजपा सरकारने परप्रांतीयांची हकालपट्टी सुरू केली आहे. पणजी येथील आझाद मैदानावरील हुतात्मा स्मारकाभोवती मुक्काम ठोकून राहिलेल्या परप्रांतीयांना त्याचा पहिला फटका बसला. स्मारकाचे पावित्र्य भंग करणाऱया या परप्रांतीयांना पोलिसांनी तेथून हुसकावून लावले. तसेच ते पुन्हा तिथे येऊ नयेत म्हणून बारीक लक्षही ठेवले जाणार आहे.
आझाद मैदानावरील स्मारक हे परप्रांतीयांचा अड्डाच बनला होता. या मैदानावर वर्षभर विविध कार्यक्रम सुरू असतात. त्या कार्यक्रमा दरम्यानही हे परप्रांतीय मैदानावर बिनधास्त झोपा काढत असतात. माजी सैनिक कल्याण संघटनेच्या वतीने कारगील विजय दिवस कार्यक्रम नुकताच साजरा केला गेला. त्या वेळीही हे परप्रांतीय स्मारकाजवळ झोपले होते. त्यांच्यामुळेच स्मारकाच्या आसपास सिगारेट्स, वेफर्सची पाकिटे, जेवणाच्या पिशव्या, दारूच्या बाटल्या पडलेल्या दिसतात. मैदानावरच्या सुलभ शौचालयाने त्यांची चांगलीच सोय केली आहे. तिथे त्यांच्या स्वच्छतेची सोय होते आणि मैदानातल्या झाडांवर कपडे वाळत टाकायला मिळतात.
माजी सैनिक कल्याण संघटनेने यासंदर्भात मुख्यमंत्री प्रमोद सावंत, आमदार बाबूश मोनस्रात, महापौर उदय मडकईकर आणि पणजी पोलिसांकडे या परप्रांतीयांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानुसार मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून पोलिसांनी परप्रांतीयांची हकालपट्टी सुरू केली आहे.
























































