पालिकेचे 239 विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत चमकले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेच्या वतीने घेण्यात आलेल्या पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (पाचवी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती (आठवी) परीक्षेत पालिकेच्या तब्बल 239 विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहेत. या परीक्षेत यशस्वी ठरलेल्या पाचवीच्या 170 तर आठवीच्या 69 विद्यार्थ्यांचा सत्कार शिक्षण समिती अध्यक्षा अंजली नाईक आणि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

शालेय जीवनातील शिष्यवृत्ती परीक्षा विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरते. या परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेची कसोटीही लागते. त्यामुळे काठिण्य पातळी जास्त असलेल्या परीक्षेत पालिका शाळांतील 239 विद्यार्थ्यांनी यश मिळवल्यामुळे सर्व स्तरातून विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येत आहे. या यशवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव समारंभास नगरसेविका समिता कांबळे, नगरसेवक प्रकाश गंगाधरे, नगरसेविका रजनी किणी, अभिनेते विद्याधर जोशी, शिक्षणाधिकारी महेश पालकर, उपशिक्षणाधिकारी भरतकुमार पांडे, जयश्री यादव आदी उपस्थित होते. या सोहळ्यात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱया शिक्षकांचाही सत्कार करण्यात आला.

शिष्यवृत्तीची रक्कम वाढवा
पालिकेचे विद्यार्थी आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकत आहेत. त्यामुळे त्यांना प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन शिक्षण समिती अध्यक्षा अंजली नाईक यांनी केले. शिष्यवृत्ती परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांना पालिकेकडून प्रत्येकी एक हजार रुपये पारितोषिकाच्या स्वरूपात दिले जातात. ही रक्कम तुटपुंजी असल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी ही रक्कम वाढवण्याच्या सूचना यावेळी नाईक यांनी प्रशासनाला दिल्या.