‘या’ कारणामुळे चित्रा वाघांनी पक्ष सोडला,शरद पवारांचा दावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, सातारा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्या चित्रा वाघ यांनी पक्ष सोडून बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांना पत्रकारांनी सातत्याने पक्ष सोडण्याचे कारण विचारले. यावेळी त्यांनी प्रत्येकाला आपण हा निर्णय कोणत्याही दवाबामुळे किंवा धाकामुळे घेतला नसल्याचे सांगितले. साताऱ्यामध्ये गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेमध्ये पवारांना चित्रा वाघ यांच्या पक्ष सोडण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला.

शरद पवार यांनी चित्रा वाघ यांच्या पक्ष सोडण्याबाबतच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटले की ‘चित्रा वाघ यांनी मला सांगितले होते की त्यांच्या संस्थेच्या संबंधीच्या दोन फायली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे पाठवल्या आहे; तसेच त्यांच्या पतीविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची केस चालू केली आहे आणि याला तोंड देणे मला अशक्य झालंय.’ ही गोष्ट चित्रा वाघ यांनी डोळ्यात पाणी आणून सांगितल्याचेही पवार यांचे म्हणणे आहे. या कारणामुळेच त्यांनी पक्ष सोडल्याचा दावा पवार यांनी केला आहे.

चित्रा वाघ यांनी स्वत: आपल्याला कोणताही धाक दाखवण्यात आला नव्हता असा खुलासा बुधवारी केला होता. मुख्यमंत्र्यांनीही शरद पवारांच्या आरोपांना उत्तर दिलं होतं. ‘धाक दाखवून पक्षात घेण्याचे भाजपचे दिवस आता राहिलेले नाहीत.’ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. पक्ष प्रवेश देताना नेत्यांचे कार्य, कर्तृत्व, समाजातील त्यांचं स्थान याचा आम्ही विचार करीत आहोत, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला होता.