
>> शेफ विष्णू मनोहर
श्वेता बिडकर. लेखन, दिग्दर्शन, निर्मिती आणि हाती अन्नपूर्णेचा वसा. असे चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व.
श्वेता बिडकर म्हणजे एक फोर इन वन पॅकेज आहे. स्टोरी रायटिंग, गाणी लिहिणं, डायरेक्शन आणि प्रॉडक्शन हाऊस व्यवस्थित सांभाळणे. मुळात रुक्ष अशा अकाऊंटिंग या विषयात प्रावीण्य मिळूनही ती या क्षेत्रात आली. श्वेताबरोबर मेजवानी हा कार्यक्रम मी जवळपास बारा वर्षे केला. त्यामुळे खाण्यापिण्याच्या गमती सेटवर नेहमी घडंत. ‘फुलोरा’च्या निमित्ताने मी तिला म्हटलं की, तुझी एक लंच किंवा डिनर डेट हवी आहे, तर ती आम्ही सेटवरच साजरी केली. ती घरून येताना माझ्याकरिता मला आवडणारा मिरचीचा हिरवा ठेचा, भाकर, झुणका व बुक्कीने फोडलेला कांदा घेऊन आली आणि मी तिला आवडणारा वैदर्भीय मसाले भात सेटवरच बनवला.
मध्येच ती म्हणाली, ‘‘आपली ओळख कशी झाली तुम्हाला आठवतं का?’’ त्यावर मी म्हटलं, ‘‘आपली ओळख खाण्याच्या पदार्थांमुळेच झाली. व्हायचं काय की, आम्ही जेव्हा ई टीव्हीकरिता शूटिंग करीत असू त्यावेळी लंचच्या वेळेस एका ठिकाणी एकत्र यायचो व डबा खायचो. तिच्या वागण्या-बोलण्यातून एक जाणवलं की, तिला वेगवेगळे पदार्थ बनविण्याची प्रचंड हौस आणि पारंपरिक पदार्थांमध्ये तिला जास्त रुची. एकत्र कुटुंब, त्याबरोबर घरी शनिवारी पंचपक्वान्नांचा सोवळ्यातला स्वयंपाक करून सगळ्यांना जेवू घालणं हा तिचा आवडता छंद.
तिला स्वतःला माशाचे वेगवेगळे प्रकार आवडतात. एकदा तिच्याबरोबर एक किस्सा घडला तो असा की, महालक्ष्मीच्या प्रसादाचे शूटिंग सुरू होते. त्यामध्ये सोळा भाज्या, चटण्या इत्यादी प्रकार आम्हाला दाखवायचे होते. 70 टक्के शूटिंग झाल्यावर लाईट गेले आणि रात्र होईस्तोवर ते आले नाहीत. हे शूटिंग होतं अष्टविनायकांमधील एक गणपती मंदिरात. दुसऱया दिवशी सकाळी आम्हाला दुसऱया शहरात शूटिंगला जायचं होतं. मग आता करायचं काय? हा यक्षप्रश्न होता. त्यावेळी श्वेता दिग्दर्शक, कॅमेरामन आणि प्रॉडक्शन या तिन्ही भूमिका करायची. त्यावेळी तिने मी व पदार्थ सोडून संपूर्ण टीम दुसऱया शहरात पाठवली. पदार्थ, मी आणि कॅमेरा इथे ठेवून दुसऱया दिवशी सकाळ उजाडल्याबरोबर शूटिंग करून तो एपिसोड पूर्ण केला.
‘मास्टर रेसिपीज’ या वेब सीरिजच्या निमित्ताने एक मोठा खाद्यकोश तयार करण्याचा तिचा मानस आहे. तेवढय़ात शूटिंगची वेळ झाल्यामूळे आम्ही आमचं बोलणं आवरत घेतलं
झुणका
साहित्य ः 1 वाटी बेसन, अर्धी वाटी बारीक चिरलेले कांदे , अर्धी वाटी तेल, 1-1 चमचा आलं-लसूण पेस्ट, पाव चमचा हळद, अर्धा चमचा धणे पावडर , तिखट चवीनुसार, अर्धा चमचा आमचूर पावडर , मीठ, साखर चवीनुसार, अर्धा चमचा मोहरी.
कृती ः तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी घालावी. मोहरी तडतडल्यावर त्यात आलं, लसूण आणि कांदे घालून चांगल्या प्रकारे परतून घ्यावे. नंतर त्यात हळद, तिखट, धणे पावडर, जिरा पावडर, आमचूर पावडर व चवीनुसार मीठ, साखर घालून थोडा वेळ परतावे. शेवटी बेसन घालावे व वरून थोडे पाणी घालून वाफेवर शिजवावे. वरून सजावटीकरिता कोथिंबीर घालावी.
मसाले भात
साहित्य ः 3 वाटय़ा तांदूळ, 1 वाटी सोललेला बटाटा, 1 वाटी फ्लॉवरचे तुकडे, अर्धा चमचा शहाजिरे, 1-1 चमचा आलं-लसूण, अर्धी वाटी दही, 1-1 चमचा धणे-जिरे पावडर, अर्धा चमचा हळद, तिखट चवीनुसार, 1 चमचा खडा मसाला, पाव वाटी कोथिंबीर, मीठ चवीनुसार, 1 चमचा काळा मसाला, 2 चमचे साजूक तूप, 4 चमचे ओलं खोबरं.
कृती ः सर्वप्रथम एक वाटी सोललेला बटाटा, एक वाटी फ्लॉवर तेलात तळून घ्या. एका पॅनमध्ये तेल घेऊन त्यामध्ये शहाजिरे, आलं, लसूण, दही, धणे-जिरे पावडर, हळद, तिखट, थोडा खडा मसाला, बारीक चिरलेली कोथिंबीर व तळलेले बटाटे, फ्लॉवर टाका. दुसऱया एका पातेल्यात पाणी गरम करून त्यामध्ये थोडं मीठ व धुतलेला तांदूळ शिजत ठेवा. त्याचबरोबर फ्लॉवर, बटाटय़ाचा मसाला व काळा मसाला पण घाला. त्यावर 2 चमचे साजूक तूप घालून मंद आचेवर भात शिजवा. वरून ओलं खोबरं, कोथिंबीर घालून खायला द्या.
कचोरी
साहित्य ः पाव किलो मैदा, 1 चमचा सोडा, पाव वाटी तेल, 100 ग्रॅम उडीद डाळ , 1 चमचा आले, 5-6 हिरव्या मिरच्या, पाव चमचा हिंग, अर्धा चमचा धणे पावडर अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा साखर, मीठ चवीनुसार, 1 चमचा लिंबाचा रस, 2 चमचा कोथिंबीर, तेल तळणासाठी.
कृती ः मैदा, मीठ आणि सोडा एकत्र मिसळावेत. तेल टाकावे आणि चांगल्या तऱहेने मिळवावे. पाणी घेऊन नरम मळावे, ओल्या कपडय़ाने झाकून एका बाजूस ठेवावे. आले, हिरवी मिरची आणि कोथिंबीर चिरून घ्यावी. उडदाची डाळ एक तास भिजवावी. नंतर वाटावी. कढईत तेल गरम करून त्यात वाटलेली डाळ, हिरवी मिरची, आले, हिंग आणि सर्व वाटलेले मसाले टाकावेत. साखर मीठ आणि लिंबू मिसळावे. गॅसवरून उतरून घ्यावे. कोथिंबीर टाकावी आणि मिश्रणास थंड होऊ द्यावे. नंतर मळलेल्या मैद्याचे 10-12 गोळे करावेत. प्रत्येक गोळा हातावर घेऊन असा पसरवावा की, ते मध्ये जाड व किनारीस पातळ असावे. त्याच्यामध्ये तयार मिश्रण भरावे. किनारीस मोडून गोल आकार देऊन हलकेच दाबून चपटे करावे. कढईत तेल गरम करावे आणि कुरकुरीत होईपर्यंत कचोरी लालसर तळावी. दही किंवा चिंचेच्या चटणीबरोबर वाढावी.
























































