
सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली
पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून हल्ले होण्याची शक्यता असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव अमरनाथ यात्रा थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंबंधी राज्यपालांच्या प्रशासनाने एक ऍडव्हायजरी जारी केली असून, यात्रेकरूंबरोबरच पर्यटकांनीही तत्काळ कश्मीर खोरे सोडावे अशी सूचना केली आहे. खोऱयात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
दरवर्षी हजारो भाविक देश-विदेशातून अमरनाथ यात्रेसाठी येतात. या वर्षी 1 जुलैपासून सुरू झालेली अमरनाथ यात्रा 15 ऑगस्टपर्यंत चालणार होती. मात्र, गुप्तचर यंत्रणांनी पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून यात्रेकरूंवर हल्ले होण्याची भीती व्यक्त केली आहे. त्यामुळे अमरनाथ यात्रा 13 दिवस आधीच रोखण्याचा निर्णय घेतला आहे.
जनरल ऑफिसर कमांडिंग, लेफ्टनंट जनरल के.जे.एस ढिल्लन यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.
पाकिस्तान आणि त्यांच्या सैन्याला कश्मीर खोऱयातील शांतता भंग करायची आहे. त्यासाठी पाकिस्तानी सैन्याच्या मदतीने दहशतवाद्यांकडून अमरनाथ यात्रा टार्गेट करण्याचा कट रचला गेला असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे.
83 टक्के दहशतवादी दगडफेक करतात
दहशतवादी बनलेले 83 टक्के तरुण लष्करावर दगडफेक करणारे आहेत, अशी माहिती लष्कर आणि पोलीस अधिकाऱयांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत देण्यात आली. सुरुवातीला या तरुणांना दगडफेक करण्यासाठी 500 रुपये दिले जातात. त्यांची माथी भडकविली जातात. नंतर हे तरुण दहशतवादी बनतात हे स्पष्ट झाल्याचे सांगितले.
ऍडव्हायजरी काय आहे?
जम्मू-कश्मीरात सध्या राष्ट्रपती राजवट आहे. राज्यपालांचे प्रशासन आहे. या प्रशासनाच्या गृहविभागाचे प्रधान सचिव शालीन काबरा यांनी एक ऍडव्हायजरी जारी केली असून, सुरक्षेच्या कारणास्तव अमरनाथ यात्रेकरू आणि पर्यटकांनीही तत्काळ कश्मीर खोरे सोडावे असे आदेश दिले आहेत.
अमरनाथ मार्गावर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी शक्तिशाली भूसुरुंग पेरले आहेत. लष्कराने केलेल्या सर्च ऑपरेशनमध्ये स्फोटके आणि अमेरिकन स्नायपर रायफल एम-24 जप्त करण्यात आली आहे. भूसुरुंगासाठीची स्फोटके ‘मेड इन पाकिस्तान’ आहेत हे तपासात स्पष्ट झाले आहे.
कश्मीरमध्ये काहीतरी मोठं घडवलं जाणार असल्याचेच हे संकेत आहेत. – मेहबूबा मुफ्ती
पर्यटकांना कश्मीरमधून बाहेर पडण्याच्या सूचना दिल्या गेल्या. यापूर्वी कधीच असे झाले नव्हते.- गुलाम नबी आझाद
चर्चा काय?
सरकारच्या आदेशानंतर देशभरात चर्चा रंगली ती कलम 370 आणि 35-अ ची. जम्मू हे स्वतंत्र राज्य निर्माण करून कश्मीर आणि लडाख यांना केंद्रशासित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. केंद्रशासित राज्यांचा कारभार दिल्लीतील राज्यपालांमार्फत हाकला जातो. त्यामुळे तेथे कोणत्याही राजकीय पक्षाला प्रवेश नसतो. सरकारी ऍडव्हायजरी म्हणजे ‘370 आणि 35 अ’ ची तयारी असल्याचे बोलले जाते.
























































