
सामना प्रतिनिधी । नांदेड
तीन दिवसांपासून नांदेड जिल्ह्यावर पावसाने कृपा केली असून जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस झाला आहे. या पावसामुळे बळीराजा सुखावला असून जिल्ह्यातील पेरण्यांची कामे जवळ जवळ पूर्ण झाली आहेत. जिल्ह्यात 80 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. शुक्रवारी रात्रीपासून पावसाने चांगला जोर धरला असून तीन दिवसांपासून सूर्यदर्शन झालेले नाही. हिमायतनगर तालुक्यात सर्वात जास्त म्हणजे 92.67 मि.मी.पावसाची नोंद झाली आहे. आठ दिवसांपूर्वी कोरडाठक असलेला सहस्त्रकुंडचा धबधबा आता ओसंडून वाहत आहे. हिमायतनगर तालुक्यात पेरण्यांच्या कामाने जोर धरला आहे.
नांदेड शहरात गेल्या दोन दिवसांपासून पाऊस पडत आहे. शहरातील सखल भागात पाणी साचले आहे. मुख्य रस्त्यावरही खड्ड्यात पाणी साचल्यामुळे वाहतुकीस अडथळा होत आहे. पावसामुळे रस्त्यावरील वर्दळ कमी आहे. कॅनॉल रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. पाऊस जोरदार असला तरी नांदेडला पाणीपुरवठा करणाऱ्या विष्णूपुरी धरणातील जलसाठ्यात वाढ झालेली नसल्यामुळे नांदेड शहरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम आहे. नांदेड जिल्ह्यात हिमायतनगर खालोखाल हदगाव तालुक्यात 67.71 मि.मी.पाऊस झाला आहे. शुक्रवारी दिवसभरात जिल्ह्यामध्ये 360.59 मि.मी.पाऊस झाला असून आतापर्यंत 843.25 मि.मी.पाऊस झाला आहे. हिमायतनगर तालुक्यात सायंकाळी पाच वाजता सुरु झालेल्या जोरदार पावसाने नद्या दुधडी भरून वाहत आहेत. विदर्भ मराठवाड्याला जोडणाऱ्या गांजेगाव येथील पुलावरुन पाणी वाहत असल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. हिमायतनगर ते इस्लापूर या रस्त्यावर पाणी आल्यामुळे जागोजागी वाहने अडकली आहेत. नाल्यांना व नद्यांना पूर आल्यामुळे हिमायतनगरशी अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
किनवट शहरातही जोरदार पावसाने हजेरी लावली. बोधडी येथे तर ढगफुटीसारखी स्थिती निर्माण झाली आहे. या अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे. अवघ्या दोन तासातच 100 मि.मी. पाऊस पडला आहे. बोधडी खु., बोधडी बु. यांच्यासह कोपरा, पार्डी या गावातही अतिवृष्टीमुळे गावे जलमय झाली आहेत. शेतातील तळे फुटून पिके वाहून गेली आहेत. उमरी-बेलदरा-हातणी रस्ता पावसामुळे बंद पडला आहे. गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरुच असल्याने बेलदरा गावाजवळील एका पूलावरून पाणी वाहत असल्याने शनिवारी सकाळी सातपासून वाहतूक बंद पडली आहे. त्यामुळे या गावातील नागरीकांना बळेगाव-कौडगाव मार्गे जावे लागत आहे.




























































