आदित्य ठाकरे यांच्या स्वागतासाठी एक हजार किलोचा हार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । बीड

सकाळपासून आदित्य ठाकरे बीड जिल्ह्यात आहेत. ठिकठिकाणी प्रचंड उत्साहात त्यांचे स्वागत केले जात आहे. तुफान गर्दी त्यांना पाहाण्यासाठी होत आहे. बीडमध्ये तर माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप, माजी युवा जिल्हाधिकारी अभिजित बरिदे यांनी तब्बल एक हजार किलोचा हार आदित्य ठाकरेंच्या स्वागतासाठी आणला. हा हार उचलणे म्हणजे महादिव्य म्हणून हार घालण्यासाठी क्रेनची व्यवस्था केली. तो एक हजार किलोचा हार बघून आदित्य ठाकरे आवाक झाले.

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची जनआशिर्वाद यात्रा बीड जिल्ह्यात दाखल झाली. आणि जिल्हावासियांच्या उत्साहाला उधाण आले. संपूर्ण जिल्हा भगवामय झाला. गंगामसल्यापासून बीडपर्यंत आणि बीडपासून गेवराईपर्यंत दुतर्फा जनतेची गर्दी होती. आदित्य ठाकरेंना पाहाण्यासाठी ग्रामिण भागातून लोक रस्त्यावर येऊन उभे राहत होते. त्यांचा सत्कार करत होते. आपल्या समस्या मांडत होते. बीडमध्ये दोन कार्यक्रम झाल्यानंतर आदित्य ठाकरे गेवराईकडे रवाना होण्यापूर्वी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांच्या कार्यालयासमोर आदित्य ठाकरेंचा ताफा अडवण्यात आला. युववासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या सत्कारासाठी माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप आणि माजी युवासेना जिल्हाध्यक्ष अभिजित बरिदे यांनी तब्बल एक हजार किलोचा हार तयार करून घेतला. हार बनवण्यासाठी तीन जिल्ह्यातून फुले आयात करण्यात आली. या हारामध्ये पाच हजार गुलाबाची फुले आहेत. हा हार आज आदित्य ठाकरे यांना स्वागतासाठी देण्यात आला. बलाढ्य हार उचलणे अशक्य असल्याने मुद्दाम क्रेनची व्यवस्था करण्यात आली होती. क्रेनच्या माध्यमातून हा हार आदित्य ठाकरे यांच्या गळ्यात घालायचा होता. मात्र मी केवळ हाराला हात लावतो तो मला पोहचला असे म्हणत आवाक झालेल्या शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी अनिल जगताप यांना बोलावून तुम्ही मला बुके द्या, हार पोहचला असे म्हटले. यावेळी लोकसभा संघटक विलास महाराज शिंदे, माजी तालुकाप्रमुख उल्हास गिराम, सुनील अनभुले, अभिजित बरिदे, विनायक मुळे, किशोर जगताप, गणेश घुंबर्डे, आकाश जगताप, सुनील गवते, अक्षय काशीद यांच्यासह मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक उपस्थित होते.