
सामना प्रतिनिधी । नांदेड
राज्यघटनेतील कलम 370 आणि 35 ए कलम रद्द करण्याची शिफारस करुन मोदी सरकारने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा पूर्ण केली आहे, अशी प्रतिक्रिया हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी दिली आहे. ते म्हणाले की, ही दोन कलमे रद्द झाल्यामुळे जम्मू कश्मीर हा हिंदुस्थाननचा अविभाज्य भाग आहे हे सिध्द झाले आहे. आता जम्मू काश्मीरमध्ये देशाचा तिरंगा फडकणार आहे. गेल्या 70 वर्षात जे काँग्रेस सरकार करु शकले नाही ते मोदी सरकारने करुन दाखविले आहे, असेही पाटील म्हणाले.
जम्मू कश्मीरचा प्रश्न सोडविण्यासाठी कलम 370 आणि 35 ए कलमे रद्द झाली पाहिजे असा आग्रह शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी धरला होता. आज ते असते तर त्याांना आनंद झाला असता, असेही हेमंत पाटील म्हणाले. ही दोन कलमे रद्द झाल्यामुळे जम्मू कश्मीरच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. आतापर्यंत पीडीपी आणि नॅशनल कॉन्फरन्ससारख्या पक्षांनी मतासाठी कलम 370 कलमाचा मुद्दा लावून धरला होता. त्यामुळे त्यांचे राजकारणाचे दुकान चालू होते. आता ते दुकान बंद झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या या धाडसी निर्णयाबद्दल हेमंत पाटील यांनी त्यांचे आभार मानले आहेत.


























































