लेख : ‘अणु’ दिनी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिलीप जोशी ([email protected])

जगातला पहिला अणुबॉम्ब जपानमधल्या हिरोशिमा शहरावर कोसळला आणि त्याने जो महाभयंकर उत्पात घडवला त्याला आज चौऱ्याहत्तर वर्षे झाली. त्याने ‘न भूतो’ असा नरसंहार आणि एका नगराचा सर्वनाश केला होता. त्याची पंच्याहत्तरी, हा हाहाकार पीडित मृतांच्या स्मृतीचा क्षण आहे. हजारो निष्पाप जिवांच्या एकाच वेळी झालेल्या आकस्मिक अंताचा हा ‘अणु’दिन, त्याचा ‘ताप’ काय असतो हे जपानने अनुभवलं आणि अवघ्या जगाने या संहारक अस्त्र्ााचा धसका घेतला तो आजतागायत.

6 ऑगस्ट 1945. सूर्य उत्तर गोलार्धातच असल्यामुळे उगवत्या सूर्याचा देश असलेल्या जपानमध्ये सकाळ लवकरच झाली होती. हिरोशिमा शहरातले नित्याचे सारे व्यवहार सुरू झाले होते. काही तासांतच एक जितंजागतं शहर उद्ध्वस्त होणार आहे याची कल्पना हिरोशिमावासीयांना असणं शक्यच नव्हतं. दुसऱ्या महायुद्धाचा विस्फोटक काळ असला तरी अचानक ते संकट आपल्यावरच कोसळेल याची जाणीव त्या सामान्य नागरिकांना कुठून असणार?

परंतु हे कृत्य घडवणाऱ्या अमेरिकेला ती पुरेपूर होती. त्यांचं बी-29 हे बॉम्बवर्षाव करणारं विमान 4 जूनलाच ओसाका शहरावर फेरी मारून गेलं होतं. क्रूरकर्मा हिटलरच्या मृत्यूनंतर आता जपानला दाती तृण धरून शरण आणण्यासाठी अमेरिका, इंग्लंड आणि दोस्त राष्ट्रांची सरकारं नि फौजा उतावीळ झाल्या होत्या. हिटलरशाही संपल्यावर जर्मनीने 8 मे 1945 रोजी शरणागती पत्करली. तरी जपानी सम्राट हिरोहितोंची राजवट माघार घ्यायला तयार नव्हती. तसा जपानचाही युद्धखोरीचा आणि नवसाम्राज्यवादाचा इतिहास काही स्पृहणीय नव्हता. चीनच्या येनान प्रांतात आक्रमण करून त्यांना जेरीस आणण्याचे उद्योग ते करतच होते. खाली सिंगापूरपर्यंत पोहोचले होते. थोडक्यात पाश्चात्त्य काय किंवा पौर्वात्य काय कोणाच्याच युद्धखोरपणाचं समर्थन करता येण्यासारखं नव्हतं. त्यामध्ये शत्रुत्व नसलेली इतर अनेक राष्ट्रे अकारण गोवली जात होती. हिंदुस्थानात ब्रिटिशांचं राज्य असल्याने आपले सैनिक दोस्त राष्ट्रांच्या बाजूने जर्मनी-जपानविरुद्ध लढत होते.

मूळ मुद्दा अणुबॉम्बचा. त्याची नांदी जर्मनीत झाली होती. सारं जग कब्जात घेण्याची हाव सुटलेल्या हिटलरने अधिकाधिक प्रभावी आणि संहारक शस्त्रास्त्र निर्मितीचा सपाटा लावला होता. ऑट्टो हॅन आणि फ्रिझ स्ट्रेसमन या जर्मन संशोधकांनी अणुविभाजनाच्या ‘फिशन’ची कल्पना मांडून 1938 मध्ये संभाव्य अण्वस्त्र्ाांची भयघंटा वाजवली होती. त्याची कुणकुण अमेरिकेला लागताच 1939 मध्येच म्हणजे दुसरं महायुद्ध सुरू झालं त्या वर्षीच अमेरिकेतही अण्वस्त्र्ाांचा विचार सुरू झाला. युरेनियम-235 वापरून असा ‘फिशन’ बॉम्ब बनवण्याची प्रक्रिया वेग घेऊ लागली. नाझी जर्मनी कोणत्याही थराला जाऊ शकतो याची दोस्त राष्ट्रांना धास्ती होतीच. दुसरी तिसरीकडे जपानही अणुबॉम्बचा विचार करू लागला होता. मात्र त्यांच्याकडे त्यासाठी लागणारी आवश्यक सामग्री आणि पैसा नव्हता. या सर्व गदारोळात आपण जग विनाशाच्या उंबरठय़ावर नेतोय याची खंत कुणालाच नव्हती.

अमेरिकेने त्यात बाजी मारली. जर्मनीच्या पाडावानंतर जपान लगेच शरण आला असता तर प्रश्नच नव्हता, पण त्यांचीही युद्धाची खुमखुमी संपली नव्हती. असं म्हणतात की, जपानी राजपुत्राने राजाला सत्ता सोडण्याविषयी सांगितलं होतं. कारण त्याला पराभव दिसत होता. 26 जुलै 1945 रोजी दोस्त राष्ट्रांनी जपानला शरण येण्याचा किंवा विनाशाला सामोरं जाण्याचा इशारा दिला. जपान दाद देत नाही असं पाहून अखेरीस ‘पॅसिफिक युद्धा’चा अंत करण्यासाठी अमेरिकेने ऍटमबॉम्बचा वापर करण्याचं ठरवलं. बॉम्बचं नावही ठेवण्यात आलं ‘लिट्ल बॉय’. पॉल टायबेट्स या पायलटच्या नेतृत्वाखाली बी-29 हे विमान आणखी सहा सहकाऱयांसह एका भयंकर कामगिरीवर निघणार होतं. या विमानाचे नाव होतं एलोना-गे.

…आणि 6 ऑगस्ट 1945 या दिवशी ते 64 किलोग्रॅम वजनाचा अणुबॉम्ब घेऊन सकाळी आठ वाजता हिरोशिमावरच्या आकाशात एकतीस हजार फुटांवर घिरटय़ा घालू लागलं. काही मिनिटांतच त्यांना नेमून दिलेले काम उरकायचं होतं. सव्वा आठ वाजले. विमान एकोणीस हजार फुटांपर्यंत खाली झेपावलं. त्याने जगातला पहिला अणुबॉम्ब भर वस्तीत टाकला. त्यांचं आयोली पुलाचं लक्ष्य चुकलं. त्याऐवजी ‘शिमा सर्जिकल क्लिनिक’वर तो पडला. काही तासांतच त्याने साऱ्या शहराचं स्मशानात रुपांतर करीत दहन केले. शहरावर बॉम्ब पडायला 44 सेकंद लागली. महामत्यूचीच ती झेप होती. क्षणार्धात वर गेलेल्या विमानातील सातजणांना प्रचंड ढग दिसला. अळंबी किंवा मश्रूमच्या आकाराच्या या ढगाला ‘मश्रूम क्लाऊड’ असंच म्हणतात. या संहारकांना स्फोटाच्या ‘शॉक वेव्ह’ही समजल्या. काम फत्ते झालं होतं, पण एक शहरच्या शहर मृत्यूने फस्त केलं होतं. दुसऱ्या महायुद्धाची ही भीषण परिणती होती. त्यात किमान 90 हजार ते कमाल एक लाख सेहेचाळीस हजार लोकांचे प्राण घेतले. त्यानंतर अणुबॉम्बच्या रेडिएशनमुळे (प्रारणांमुळे) अपंग झालेल्यांच्या क्लेशदायी कथा – व्यथा जगासमोर आल्या. युद्ध अनुभवाला येत नाही तोपर्यंत त्याच्या कथा रम्य असतात. तरीही अस्तित्वाच्या लढाईसाठी अनेकदा लढावंच लागतं. परंतु दुसरं महायुद्ध सत्तालालसेतून जन्माला आलेलं होतं. तिने सारं जगच वेठीला धरलं. दोन्ही बाजूंचे लाख लाख सैनिक या सहा वर्षांत गारद होत होते. श्रीमंत राष्ट्रांचा पैसा शस्त्र्ाास्त्र्ा निर्मितीत गुंतला होता. अन्नधान्याचा तुटवडा निर्माण झाला होता. हिंदुस्थानातही ‘रेशनिंग’ नावाचा प्रकार तेव्हाच अस्तित्वात आला.

अण्वस्त्र्ााने होणाऱ्या संहाराची आणि उत्पाताची जगाला त्यावेळी कल्पना नव्हती. नंतर ‘पॉफेसी’सारख्या चित्रपटातून ते जगासमोर आलं. मात्र त्यानंतरच्या जगाने तरी त्यापासून काही धडा घेतला आहे का, हा प्रश्नच आहे!