
>> ज्योत्स्ना गाडगीळ
स्वत: 1400 पुस्तकं वाचली, 10 लाख लोकांना विविध विषयांवर पुस्तकं वाचायला लावली आणि 2020 पर्यंत 10 कोटी लोकांना तो वाचनाचा छंद लावणार आहे. हे मिशन आहे ठाणेस्थित अमृत देशमुख ह्या तरुणाचं. `मेक इंडिया रीड’ हे ध्येय उराशी बाळगून तो लोकांना वाचनाची गोडी लावत आहे आणि पुस्तकांत साठून राहिलेलं ज्ञान`अमृत’ त्यांच्या गळी उतरवत आहे. कसे ते पहा…
पुस्तकात गढून गेलेला अमृत देशमुख, हा पुस्तकातला किडा नसून पुस्तकातले फुलपाखरू आहे, असे डॉ. आनंद नाडकर्णी एका मुलाखतीत म्हणाले होते. त्यांनी दिलेली उपाधी अतिशय चपखल आहे. किडे फुलांची नासधूस करतात, मात्र फुलपाखरू पराग वेचतात, मध गोळा करतात आणि आपल्या आल्हाददायक अस्तित्वाने वातावरणात रंग भरतात. अमृतचेही तसेच आहे. त्याने पुस्तकातून आनंद घेतला आणि इतरांनाही वाटला. लोकांमध्ये पुस्तकप्रेम जागृत करून वाचनाचा आनंद घ्यायला शिकवला. अशा ह्या फुलपाखराने मोठी झेप घेत आपल्या देशाला वाचवण्याचा अर्थात वाचायला लावण्याचा ध्यास घेतला आहे. त्याची पूर्तता तो करत आहे, त्याच्या `बुकलेट’ नावाच्या अॅपमधून. ह्या अॅपवर तो पुस्तकांचा सारांश देतो आणि वाचकाची उत्कंठा वाढवून त्यांना पुस्तक वाचायला भाग पाडतो.
तसे पाहता पुस्तक परीक्षण वृत्तपत्रातही छापून येते. परंतु तेही वाचायला लोकांकडे वेळ नाही, अशी सबब ते पुढे करतात. हे लक्षात घेऊन अमृतने `बुकलेट’च्या माध्यमातून पुस्तकाचा सारांश सांगायला सुरुवात केली. `सबकुछ मोबाईल’ झालेल्या आजच्या पिढीला पुस्तकही मोबाईलवर उपलब्ध आहे, परंतु ते उघडून बघण्याची जिज्ञासा नाही. ती जागृत करण्याचे काम अमृतने केले आहे. पुस्तकांचे सारांश कथन करण्याची त्याची पद्धत जरा हटके आहे. स्वत:च्या आवाजात तो कथाकन करतो, खुसखुशीत संवादाची पेरणी करतो आणि पुढे काय होणार हे कळायच्या आत सारांशाची समाप्ती करतो. हा फंडा वापरल्यामुळे अमृतने कित्येक वाचकांना पुस्तकगंगेची सैर घडवली आहे. बालपणात सुटलेली वाचनाची गोडी पुन्हा लावली आहे. त्यामुळे गेल्या तीन वर्षांत दहा लाख वाचक त्याच्या उपक्रमाशी जोडले गेले आहेत. तर 2020 पर्यंत अमृतला हा आकडा 10 कोटी वाचकांचा आकडा करायचा आहे.
अमृतची बालपणापासून पुस्तकांशी चांगली गट्टी जमली होती. दहावीपर्यंत त्याने बालविश्वातल्या कैक पुस्तकांचा फडशा पाडला. मात्र, दहावीनंतर विषयांचा आवाका वाढू लागला. तो सर्व प्रकारची पुस्तकं वाचू लागला. त्याला वाचनाची `गोडी’, नव्हे तर `सवय’ लागली, ती त्याच्या मोठ्या भावामुळे! अमृतच्या वाढदिवसाला मित्रांनी, नातेवाईकांनी, पालकांनी खेळणी न देता पुस्तक भेट म्हणून द्यावे, असा त्याने फतवा काढला होता. त्यामुळे विरंगुळा म्हणून बालपणीच हातात खेळण्यांऐवजी छान छान पुस्तकं आली आणि अमृतला वाचनाची गोडी लागली. त्याचे श्रेय तो भावाला देतो. शिक्षण पूर्ण करेपर्यंत त्याची आवड त्याच्यापुरती मर्यादित होती. लेखापाल होऊन तो `बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज’मध्ये नोकरीला लागला. तिथे फार काळ मन रमले नाही, म्हणून त्याने नोकरी सोडून सीए शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची शिकवणीही घेऊन पाहिली. आणखी एक दोन छोट्या उद्योगात नशीब आजमवल्यावर पदरात अपयश आले. मात्र अशा पडत्या काळातही पुस्तकांनी त्याची आणि त्याने पुस्तकांची साथ सोडली नव्हती. तिच साथ त्याच्या कामी आली.
एकदा, मित्राबरोबर चित्रपट बघायला गेलेला असताना चित्रपट सुरू होण्याआधी गप्पांच्या ओघात अमृतने नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाचा सारांश कथन केला. मित्राचे कुतुहल चाळवले. त्याने अमृतला त्याच्या वाचनात आलेल्या पुस्तकांचे सारांश पाठवायला सांगितले. तो क्षण अमृतच्या आयुष्यातील `युरेक्का’ क्षण होता. त्याला आपल्या अंगभूत कलेची जाणीव झाली आणि त्याने गंमत म्हणून दर आठवड्याला एका पुस्तकाचा सारांश व्हॉट्स अॅपवर 10 मित्रांना पाठवायला सुरुवात केली. सोबत पुस्तकाची लिंक, माहिती आणि मुखपृष्ठ जोडले. त्याची संकल्पना इतकी व्हायरल झाली, की काही महिन्यांतच वाचकसंख्या 1 लाखांच्या वर गेली. उपक्रमाला बाळसे धरू लागले, तेव्हा अमृतने संज्योत शहा ह्या आयटी मित्राच्या मदतीने `जागतिक पुस्तक दिना’च्या मुहुर्तावर `बुकलेट’ नावाचे अॅप सुरू केले. आता, त्याच्या वाचकसंख्येने 10 लाखांचा पल्ला पार केला आहे.
एकीकडे वाचन संस्कृती लोप पावत असल्याची ओरड, तर दुसरीकडे पुस्तकाच्या अॅपचे लाखो फॉलोअर्स हे परस्परविरोधी चित्र पाहून सत्य परिस्थिती काय, याबद्दल अमृतला विचारले असता तो म्हणतो, `वाचन संस्कृती अजिबात लोप पावलेली नाही. लोकांची आवड बदलली आहे. वाचनाचे माध्यम बदलले आहे. एखादे साहित्य तुम्ही पुस्तकात वाचा, आयपॅडवर वाचा नाहीतर मोबाईलवर वाचा…शेवटी ते वाचनच! एवढेच काय, तर काही जण पुस्तकांच्या ऑडिओ ऐकतात, तेही वाचनच. शेवटी रसग्रहण महत्त्वाचे. ते होत आहे, म्हणजेच वाचन संस्कृती जिवंत आहे. फक्त तिला योग्य वळण देण्याची गरज आहे. एखादे पुस्तक उघडून पाहिलेच नाही, तर आत काय आहे, याची कल्पनाच येणार नाही. ते उघडून दाखवण्याचं आणि उघडायला लावण्याचं काम मी करतो. जे लोक वेळ नाही अशी सबब देतात, ती सबब खोटी आहे. जर तुमच्याकडे `फेसबुक’ बघायला वेळ आहे, तर `बुक’ वाचायलाही नक्कीच वेळ आहे. फक्त इतर कामांच्या तुलनेत वाचनाला प्राधान्य दिले जात नाही. आपल्या रोजच्या कामात आपण `कोणती कामे करायची’ ह्याची यादी करतो, त्यापेक्षा `कोणती कामे करायची नाहीत’ ह्याची यादी केली, तर आपला बराचसा फुकट जाणारा वेळ वाचू शकतो. मी स्वत: तेच करतो. न आवडणारी कामं दिवसाच्या सुरुवातीच्या तीन तासांत संपवून टाकतो आणि उरलेल्या दिवसभरात माझ्या आवडीची कामे नेमून करतो. काही लोकांना पुस्तकांची जाडी बघून झोप येते. अशा लोकांनी फक्त 3 पानांचे टार्गेट ठेवून वाचायची सवय लावावी आणि संबंधित विषयाची आवड असलेली व्यक्ती शोधून वाचलेल्या विषयावर चर्चा करावी. त्यामुळे विषय लक्षात ठेवावा लागत नाही, तर आपोआप लक्षात राहतो. एकच विषय न हाताळता निरनिराळ्या विषयांचे वाचन करावे. त्यामुळे आपल्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात. मी माझ्या वाचकांची आवड आणि त्यांच्यासाठी उपयोगी साहित्य लक्षात घेता 80 टक्के साहित्य माहितीपर आणि 20 टक्के साहित्य मनोरंजनावर आधारित घेतो. देश-विदेशातले लोक ह्या साहित्याचा आस्वाद घेत आहेत. माझे शिक्षण इंग्रजीत झाल्यामुळे बहुतांश इंग्रजी पुस्तकांचे परीक्षण करतो. परंतु, भारतीय भाषांमधील साहित्य जागतिक पातळीवर पोहोचावे, म्हणून मी वाचकांना त्यांनी वाचलेल्या पुस्तकांचा सारांश लिहून ह्या उपक्रमाशी जोडण्याचे आवाहन केले आहे. तसे केल्यामुळे सर्वभाषिक पुस्तकांचा गोषवारा इंग्रजीत भाषांतरित करून भारतीय साहित्य जगभरता पोहोचवता येईल आणि माझी `मेक इंडिया रीड’ ही संकल्पना खऱ्या अर्थाने सत्यात उतरेल.’
अमृतने `बुकलेट’च्या माध्यमातून तीन वर्षांत पुस्तकांचे अनोखे विश्व उभे केले आहे. त्याचा वाचनाचा वेग वाळवीच्या दुप्पट आहे. सामान्य वाचक एका मिनिटांत 150 शब्द वाचू शकतो, तर अमृत एका मिनिटांत 1200 शब्द वाचतो. पुस्तक वाचनाचे तंत्र त्याने एका इंग्रजी पुस्तकातूनच आत्मसात केले आहे. दिवसाला तो एक पुस्तक वाचतो आणि आठवड्याला एका पुस्तकाचे सारांश प्रकाशित करतो. त्याच्याकडे 500 पुस्तकांचे सारांश तयार आहे. ह्या कामात त्याला फरीद सय्यद नावाच्या मित्राची मदत होते.
अमृत आपल्या उपक्रमाकडे उत्पन्नाचे साधन म्हणून न पाहता कर्तव्य म्हणून पाहतो. `वाचाल तर वाचाल’ हे नुसते वाचून उपयोगाचे नाही, तर वाचायला लावणे गरजेचे आहे. हे लक्षात घेऊन अमृतने ही चळवळ राबवली आहे. त्याचे अॅप मोफत आहे. तुम्हालाही ह्या ग्रंथालयाचे मोफत सदस्य व्हायचे असेल, तर मोबाईलवर `बुकलेट’ हे अॅप डाऊनलोड करा किंवा 9594700077 ह्या क्रमांकावर संपर्क साधून व्हॉट्स अॅपवर पुस्तकांचे अपडेट्स मिळवा.
आजच्या मोबाईल युगात अमृतचे ज्ञाना`अमृत’ लोकांना संजीवनी देण्याचे काम करत आहे. मग तुम्ही तरी स्वत:ला ह्या ज्ञानगंगेपासून वंचित कशाला ठेवता?
























































