लेख : वाढती लोकसंख्या कशी रोखणार?  

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> सुनील कुवरे

संयुक्त राष्ट्रसंघाने जाहीर केलेली आकडेवारी हिंदुस्थानसाठी एक मोठा इशारा आहे. मर्यादित भूभाग असलेल्या हिंदुस्थानला मर्यादित लोकसंख्येशिवाय पर्याय नाही. तेव्हा वाढती लोकसंख्या आणि त्याचे दुष्परिणाम बघता केवळ ‘सबका  साथ सबका विकास’ अशी घोषणा देऊन चालणार नाही. लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी सरकारी पातळीवर अनेक योजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी झाली पाहिजे. तसेच समाजानेही त्याचे योग्य भान ठेवायला हवे. कारण लोकसंख्या नियंत्रणात आणणे हे आज महत्त्वाचे आहे.

हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळून 70 वर्षे पूर्ण झाली, मात्र गरिबी, दारिद्रय़, बेरोजगारी या समस्यांवर मात करण्यात अजूनपर्यंत पाहिजे तसे  यश आल्याचे दिसत नाही. एकीकडे आपण महासत्ता बनण्याची स्वप्ने पाहत आहोत, तर दुसरीकडे लोकसंख्येसारखा अतिशय गंभीर प्रश्न एखाद्या भस्मासुरासारखा उभा ठाकला आहे. हिंदुस्थानच्या लोकसंख्येत होणारी वाढ ही चिंताजनक आहे. केंद्र सरकार गेल्या अनेक वर्षांपासून वाढती लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी सरकारी पातळीवर वेळोवेळी अनेक उपक्रम राबवित आहे. तरीही पाहिजे तेवढय़ा प्रमाणात लोकसंख्येचा वाढता वेग कमी करण्यात यश आले नाही ही खरी वस्तुस्थिती आहे. फक्त लोकसंख्या दिन साजरा करून हिंदुस्थानची किंवा जगाची लोकसंख्या कमी होणार नाही.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या अलीकडे केलेल्या सर्वेक्षणात लोकसंख्येच्या दृष्टीने  जगाच्या लोकसंख्येत वाढ होऊन 2019 मध्ये ती 771.5 कोटी इतकी झाली आहे. गेल्या वर्षी ही आकडेवारी 763.5 कोटी होती. म्हणजे आजच्या घडीला जास्त लोकसंख्या केवळ दहा देशांतच आहे. त्यात पहिला नंबर चीनचा तर दुसरा नंबर हिंदुस्थानचा लागतो. त्यातही हिंदुस्थानचा लोकसंख्यावाढीचा वेग जगात सर्वाधिक आहे. हिंदुस्थानच्या लोकसंख्येत वाढ झाली असून ती 136 कोटींवर गेली आहे. 2010 ते 2019 या काळात 1.2 टक्के वार्षिक दराने ही वाढ झाली आहे. चीनच्या वार्षिक लोकसंख्यावाढीच्या दरापेक्षा ही वाढ निम्म्याने जास्त आहे. पुढील दहा वर्षांत हिंदुस्थानची लोकसंख्या दीडशे कोटी होण्याचा अंदाज वर्तविला गेला आहे. 1994 साली हिंदुस्थानची लोकसंख्या 94.22 कोटी इतकी होती. तत्पूर्वी 1969 मध्ये ती 54.15 कोटी इतकी होती. संयुक्त राष्ट्रसंघाच्या आकडेवारीनुसार 2010 आणि 2019 मध्ये हिंदुस्थानच्या लोकसंख्येत 1.2 टक्क्यांनी वाढ झाली आहे.  कारण आजही देशात दर मिनिटाला 51 बालके जन्माला येतात. म्हणजे एका तासाला 3060 बालके जन्म घेतात. तेव्हा आतापासून लोकसंख्या नियोजनामध्ये आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे. कारण सर्व मूलभूत सुविधांवर ताण पडणार नाही. स्वातंत्र्यानंतरच्या काळात वाढत चाललेली लोकसंख्या आणि त्यावेळच्या काळात राबवलेली धोरणे आणि योजना आता अपुऱ्या पडत आहेत.

आज देशातील गरिबी आणि दारिद्रय़ाचे वास्तवही लक्षात घेणे गरजेचे आहे. हिंदुस्थानच्या एकूण लोकसंख्येच्या 40टक्के लोक पूर्णपणे साक्षर नाहीत. तर 45 टक्के लोक दारिद्रय़रेषेखाली राहतात. हिंदुस्थानच्या ग्रामीण भागात प्रत्येक माणसाचे दरडोई उत्पन्न शंभर रुपये रोज इतके आहे. आजही आपल्या देशात आर्थिक विषमता ही मोठी गंभीर समस्या आहे. या विदारक सत्यात आतापर्यंत आलेले राजकारणी मंडळी आणि त्यांचा नाकर्तेपणा जबाबदार आहे. कारण हिंदुस्थानचा विकास हा एका विशिष्ट मार्गाने सुरू असला तरी विकास करण्यात अडथळा निर्माण होत आहे तो म्हणजे वाढत्या लोकसंख्येचा. आतापासूनच लोकसंख्या रोखण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. एकीकडे नैसर्गिक साधनसंपत्ती कमी होत असताना  दुसरीकडे लोकसंख्येचा वेग वाढणे हे  भस्मासुराला  निमंत्रण देण्यासारखे आहे.

संयुक्त राष्ट्रसंघाने जगातील सर्वच देशांच्या लोकसंख्येचा आढावा घेतला. त्यातला महत्त्वाचा भाग असा आहे की, जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश म्हणून हिंदुस्थानचा शेजारी चीनचा उल्लेख होतो. परंतु 2027 पर्यंत हिंदुस्थान चीनला मागे टाकून जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश होण्याची भीती आहे. त्यावेळी हिंदुस्थानची लोकसंख्या दीडशे कोटी इतकी होईल. त्याचवेळी चीन आणि अमेरिका या देशांची लोकसंख्या कमी होताना दिसेल आणि त्यांची संपन्नता अधिकाधिक वाढतानाही पाहायला मिळेल.

हिंदुस्थानची लोकसंख्या शंभर कोटींच्या घरात गेली तेव्हा लोकसंख्यावाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रभावी उपाययोजना अमलात आणा असा इशारा समाजशास्त्र्ाज्ञांनी दिला होता. कारण लोकसंख्यावाढीमुळे सर्व नियोजन कोलमडून जाईल. आता संयुक्त राष्ट्रसंघाच्या या अहवालानुसार हिंदुस्थानला वाढत्या लोकसंख्येवर नियंत्रण ठेवावे लागेल. हिंदुस्थानला यासंदर्भात काही ठोस पावले उचलावी लागतील, नाहीतर एवढी मोठी लोकसंख्या सांभाळणे कठीण होऊन बसेल. चीनने  लोकसंख्या हे कधीही ओझेही मानले नाही. याचा अर्थ चीनने लोकसंख्या वाढवली असे नव्हे. तर उलट अतिशय कठोरपणे उपाय योजले आणि लोकसंख्या नियंत्रणात आणली. त्याचबरोबर चीनने आपल्याकडे असलेल्या मानवी शक्तीचा उपयोग राष्ट्राच्या विकासासाठी करून घेतला.

तेव्हा संयुक्त राष्ट्रसंघाने जाहीर केलेली आकडेवारी हिंदुस्थानसाठी एक मोठा इशारा आहे. मर्यादित भूभाग असलेल्या हिंदुस्थानला मर्यादित लोकसंख्येशिवाय पर्याय नाही. तेव्हा वाढती लोकसंख्या आणि त्याचे दुष्परिणाम बघता केवळ ‘सबका  साथ सबका विकास’ अशी घोषणा देऊन चालणार नाही. लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी सरकारी पातळीवर अनेक योजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी झाली पाहिजे. तसेच समाजानेही त्याचे योग्य भान ठेवायला हवे. कारण लोकसंख्या नियंत्रणात आणणे हे आज महत्त्वाचे आहे. लोकशाहीमध्ये या नियंत्रणाची सक्ती करता येत नाही तरी ती आपली प्रत्येक समाजाची सामाजिक जबाबदारी आहे.