
सामना प्रतिनिधी । लातूर
लातूर जिल्ह्यात एकही मोठे धरण नाही. लातूर शहरासह जिल्ह्यातील अनेक गावांना मांजरा धरणातून पाणी पुरवठा होतो. बीड जिल्ह्यातील अनेक गावांना तसेच औद्योगिक वसाहतीस या धरणातून पाणी पुरवठा होतोय परंतु सध्या पावसाअभावी मांजरा धरणच तहानलेले आहे. मृतसाठ्यातील पाण्यावर कांही दिवस तहान भागणार आहे परंतू लवकरच हे धरण पावसाअभावी कोरडेठाक पडण्याच्या मार्गावर आहे.
बीड जिल्ह्यातील धनेगाव ता. केज येथे असणाऱ्या मांजरा प्रकल्पाची पुर्ण संचय पाणीपातळी ही ६४२.३७ मिटरची आहे. २२४.०९३ दशलक्षघनमिटर एवढा पाणीसाठा होतो. या धरणाचा मृतसाठा ४७.१३० दशलक्षघन मिटर एवढा आहे. तर १७६.९६३ दशलक्षघन मिटर उपयुक्त पाणीसाठा आहे. आज रोजी या धरणात मृतसाठ्यातील केवळ ६.५४२ दशलक्षघन मिटर एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. साधारणपणे केवळ १ महिना हे पाणी पुरेलअशी स्थिती आहे. पाऊसच झाला नाही तर मात्र हे धरण लवकरच कोरडे पडण्याची चिन्हे दिसून येत आहेत. या पावसाळ्यात आजपर्यंत धरणाच्या ठिकाणी केवळ १५० मि.मी. पाऊस झालेला आहे. तर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये केवळ १०६.१० मि.मी. पाऊस झालेला आहे.
हे धरण कोरडे पडले तर लातूर शहरासह लातूर औद्योगीक वसाहत तसेच अनेक गांवांचा पाणीपुरवठा बंद होणार आहे. त्यामुळे सर्वांच्या नजरा पावसाकडे लागलेल्या आहेत.



























































