
सामना ऑनलाईन, नवी दिल्ली
उन्नाव अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी आमदार कुलदीपसिंह सेंगर याच्यावर दिल्लीतील तीस हजारी कोर्टाने शुक्रवारी आरोपपत्र दाखल केले. त्याच्यावर आता पॉक्सो ऍक्टअंतर्गतही खटला चालणार आहे. सेंगरच्या आरोपपत्रात या कायद्याच्या कलमांचाही उल्लेख करण्यात आला असून त्यासाठी लागणारे पुरावे आणि साक्षीदार त्याच्याविरोधात उपलब्ध आहेत, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
कुलदीपने 4 जून 2017 रोजी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला होता. त्याच्या कृत्यात शशी सिंह हाही सामील होता. नोकरी देण्याच्या आमिषाने शशी सिंहनेच पीडितेला कुलदीपसिंह याच्या घरी नेले होते. त्याच आधारावर कुलदीपवर आरोपपत्र दाखल करण्यात आले असून त्याच्यावर पॉक्सो कायद्याअंतर्गत खटला चालवला जाणार आहे.


























































