
सामना प्रतिनिधी । लातूर
न्यायालयाच्या आदेशाने जमीन मोजणीचे काम करीत असताना जमीन मोजायची नाही म्हणून शासकीय कामात अडथळा केल्या प्रकरणी चाकूर तालुक्यातील मौजे बेलगाव येथील ४ जणांवर किनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी किनगाव पोलीस ठाण्यात पंजाबराव नागोराव शिंदे, उपअधिक्षक भुमिअभिलेख कार्यालय चाकूर यांनी तक्रार दाखल केली. न्यायालयाच्या आदेशानूसार अर्जदार कोमल कासले रा. बेलगाव शेत गट नं. १४३ ची मोजणी करुन अर्जदाराच्या ताब्यात देण्याकरीता नियमानुसार पोलीस बंदोबस्तात काम करीत असतानाही रामराव नागनाथ कासले आणि इतर तिघांनी आमची जमीन मोजायची नाही असे म्हणून फिर्यादीस जमीन मोजण्यास मज्जाव केला. शासकीय कामात अडथळा निर्माण केला म्हणून चारजणांविरुध्द किनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एपीआय चव्हाण हे करीत आहेत.























































