
सामना प्रतिनिधी । मुंबई
‘कर लो दुनिया मुठ्ठी में’ म्हणत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्सने मोबाईल क्रांती केली होती. त्यानंतर केवळ श्रीमंतांना परवडणारा मोबाईल सर्वसामान्यांच्याही मुठीत वावरू लागला. अंबांनी यांनी आता दुसरी क्रांती केली असून आता प्रकाशाच्या वेगाइतका इंटरनेट स्पीड देणारी जिओ गिगा फायबर योजना आज त्यांनी सादर केली. केवळ 700 रुपयांत 100 एमबीपीएसचा स्पीड मिळणारी ही योजना 5 सप्टेंबरपासून कार्यान्वित होणार आहे. जिओची ही योजना म्हणजे ‘पाओ इंटरनेट चुटकी में’ अशीच असणार आहे!
रिलायन्स इंडस्ट्रीजची 42वी सर्वसाधारण सभा सोमवारी मुंबईत पार पडली. त्यात मुकेश अंबानी यांनी जिओ गिगा फायबरची घोषणा केली. जिओ फायबरच्या 700 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना 100 एमबीपीएस इंटरनेट स्पीड मिळेल. तर प्रीमियम पॅकचा स्पीड 1 जीबीपीएस असणार आहे. हिंदुस्थानच फिक्स्ड ब्रॉडबँड कनेक्शन डाऊनलोड स्पीड 26.46 एमबीपीएस असून अपलोड स्पीड हा 21.91 एमबीपीएस आहे.
15 दशलक्ष ग्राहकांची जिओ फायबरसाठी नोंदणी
गेल्या वर्षभरात रिलायन्सने मोठी भरारी घेतली आहे. जिओने बाजारपेठेचा 32 टक्के हिस्सा व्यापला असून रिलायन्स हा सर्वाधिक कर भरणारा उद्योग समूह आहे, असे सांगतानाच जिओ फायबरसाठी 1600 शहरांमधून 15 दशलक्ष ग्राहकांनी नोंदणी केली आहे. 50 लाख घरांमध्ये याआधीच प्रायोगिक तत्त्वावर जिओ गिगा फायबर सुरू असल्याचे मुकेश अंबानी यांनी सांगितले. यात हायस्पीड इंटरनेटसोबतच अन्य स्मार्ट होम सुविधादेखील मिळणार आहेत.
ठळक मुद्दे
- नोंदणीसाठी शुल्क आकारले जाणार नाही.
- ज्या ठिकाणी कनेक्शन हवे आहे त्या भागात जिओ फायबरचे जाळे असेल तर कनेक्शन मिळेल.
- जिओ गिगा फायबरची किंमत जागतिक पातळीचा विचार करता स्पर्धकांच्या तुलनेत एकदशांश असल्याचा दावा रिलायन्सने केला आहे.
- वर्षभराचा प्लॅन घेतल्यास एचडी एलईडी टीक्ही आणि सेट टॉप बॉक्स मोफत मिळणार आहे.
- एक अब्ज घरांमध्ये इंटरनेट ऑफ थिंग्जने (IOT)कनेक्ट करण्याचे रिलायन्सचे लक्ष्य
जिओ फायबरची वैशिष्टय़े
- 700 रुपयांपासून ते 10 हजार रुपयांपर्यंतच्या दरात.
- सर्वात कमी 700 रुपयांच्या पॅकमध्ये आजीवन फ्री व्हॉईस कॉल, हायस्पीड इंटरनेट, मोफत एचडी टीव्ही, सेटटॉप बॉक्स.
- सेटटॉप बॉक्सद्वारे व्हिडीओ कॉलिंगची सुविधा.
- केबल टीव्ही, व्हॉईस कॉलिंग आणि नवे सिनेमे या सुविधा.
- ज्या दिवशी सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित होणार त्याच दिवशी पाहता येणार. जून 2020नंतर ही सेवा सुरू होईल.
- जिओ फायबरद्वारे व्यक्तिगत पातळीपासून ते कार्यालये, उद्योजक तसेच कंपन्यांना हायस्पीड इंटरनेट कनेक्शन मिळणार.
ऑनलाइन नोंदणी अशी करा…
- जिओ फायबरच्या नोंदणीसाठी https://gigafiber.jio.com/registration येथे करा
- कनेक्शन हवे असलेले ठिकाण लिहा.
- ठिकाणाचा संपूर्ण पत्ता लिहा.
- त्यानंतर ग्राहकाचे नाव, मोबाईल नंबर आणि ई-मेल आदी माहिती भरा.
- तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल, तो टाका आणि सबमिटचे बटण दाबा.
घरबसल्या थिएटरचा अनुभव
आकाश आणि ईशा अंबानी यांनी मिक्स रिऑलिटी (MR) डिव्हाईस सादर केले. हे डिव्हाईस रिलायन्सच्या एमआर लॅबमध्ये डिझाईन्स केले आहे. जिओच्या मिक्स रिऑलिटीचे नाव जिओ होलोबोर्ड असे असून लवकरच ते बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. हे डिव्हाईस डोळ्यांवर लावल्यास घरबसल्या टीव्ही पाहताना थिएटरचा अनुभव घेता येणार आहे.


























































