
>> प्रभाकर पवार
मोटार वाहन नियमांचे उल्लंघन करणार्या व कोणत्याही कायद्यांना न जुमानणार्या बेशिस्त व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या वाहनचालकांना चाप बसावा, कायद्याची भीती निर्माण व्हावी म्हणून 30 वर्षांपूर्वीच्या मोटार वाहन कायद्यात बदल करण्यात आले असून राष्ट्रपतींनी त्यास नुकतीच मंजुरी दिली आहे, परंतु अद्याप अधिसूचना जारी झालेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार विनापरवाना वाहन चालविल्यास 5 हजार रुपये दंड आहे. दारू पिऊन वाहन चालविल्यास 10 हजार रुपये, वेगाने गाडी चालविल्यास किंवा रेसिंग केल्यास 5 हजार रुपये, कागदपत्रे सोबत नसल्यास 1 हजार रुपये, स्कूटर किंवा बाईकवर दोनपेक्षा अधिक व्यक्ती असल्यास 2 हजार रुपये दंड आणि 3 महिने परवाना रद्द, विनाहेल्मेट वाहन चालविल्यास 2 हजार रुपये दंड व 3 महिने परवाना रद्द, अल्पवयीन मुलाने वाहन चालविल्यास मालकाला किंवा वडिलांना 3 वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा, वाहन चालविताना मोबाईलवर बोलणार्याला 5 हजार रुपये दंड… आदी बर्याच जुन्या कायद्यात नवीन बदल करण्यात आल्यामुळे वाहनचालकांचे धाबे दणाणले आहेत.
रोज वाहतुकीचे नियम मोडणार्या सराईत वाहनचालकांचा रोज वाहतूक पोलिसांबरोबर वाद होत असतो. त्यात आता वाढ होणार आहे. नव्या मोटार वाहन कायद्यानुसार दंडाच्या रकमेत किमान पाच ते दहा टक्के वाढ झाली आहे. पूर्वी हेल्मेट व सीट बेल्ट न वापरणाऱयांकडून वाहतूक पोलीस 100 रुपये दंड आकारायचे आता त्यात 10 पट वाढ झाली आहे. त्यामुळे पोलिसांबरोबर गुन्हेगारी प्रवृत्तीचे वाहनचालक वाद घालत आहेत, त्यांच्याशी भांडण करीत आहेत. प्रसंगी हल्लाही करीत आहेत. वाहतूक पोलिसांवरील हल्ल्यात दिवसेंदिवस (वाहतूक कोंडीप्रमाणे) वाढ होत आहे.
वाहतूक कोंडीची समस्या तर मुंबईसह सार्या जगभरात आहे. तुम्ही एक तास जरी वाहतुकीत अडकलात तरी तुमच्या आरोग्यावर परिणाम होतो. मग दिवसभर उन्हातान्हात आपला जीव धोक्यात घालून वाहतुकीचे नियंत्रण करणार्या वाहतूक पोलिसांच्या आरोग्याचे काय होत असेल याचा विचार करा! रोज नायट्रोजन ऑक्साईडचे श्वसन करून वाहतूक पोलिसांच्या फुप्फुसांचे तीनतेरा वाजतात. पैसे कमी आणि विषारी वायू जास्त खाणार्या वाहतूक पोलिसांसमोर आता नव्या वाहतूक नियमांचे आव्हान उभे राहिले आहे. त्याचा ते कसा सामना करतात हे नवीन मोटार वाहन नियमांचे नोटिफिकेशन जारी झाल्यावरच कळणार आहे. आज आपल्याकडे वाहतूकविषयक नवनवीन नियम जारी होतात, कायदे बनविले जातात; परंतु वाहतूक कोंडीवर, समस्येवर तोडगाच निघत नाही. वाहतूक कोंडीत सापडलेला आज प्रत्येकजण तणावाखाली असतो. वाहतूक कोंडीमुळे प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. बराच वेळ गाडीत बसल्यामुळे स्नायू आखडतात (स्टिफ). मधुमेह असेल तर लघवीचा त्रास होतो. वाहतुकीची समस्या ही आता असाध्य रोग कॅन्सरसारखी झाली आहे. आज प्रत्येक घरात दोन–चार गाड्या आहेत. अगदी फुटपाथवर झोपणार्या किंवा दारिद्रय़रेषेखाली असणार्या माणसाकडेही दुचाकी वाहन असते आणि प्रत्येकजण त्याचा रोजगार मिळविण्यासाठी वापर करतो. म्हणजे आज माणसांपेक्षा वाहनांची संख्या जास्त झाली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी ही न संपणारी समस्या आहे. जगातील सर्व शहरी भागांना ही समस्या भेडसावत आहे; परंतु परदेशात कायदे पाळले जातात. आपल्याकडे मात्र फाटय़ावर मारले जातात. त्यामुळेच रोज वाहतूक पोलीस व वाहनचालक असा संघर्ष आपल्याला रस्त्यावर दिसून येतो. पोलीस आता कोणतीही दंडाची पावती फाडत नाहीत. दंडाच्या रकमेचे थेट ई–चलन घरी पाठवतात किंवा मेल करतात. त्याचीही महाराष्ट्र पोलिसांची 100 कोटी रुपयांच्या वर थकबाकी असून पोलिसांना ती वाहनचालकांकडून वसूल करणे कठीण होत आहे. आपल्या देशाइतके बेशिस्त लोक या जगाच्या पाठीवर कुठेच दिसून येत नाहीत. महाराष्ट्र पोलिसांनी गेल्या तीन वर्षांत सुमारे 55 लाख ई–चलन जारी केले. परंतु वाहतूक नियम पाळायचे सोडा, दंडाची रक्कम भरायचीही दानत बरेच वाहनचालक दाखवत नाहीत. गेल्या वर्षी 9 हजार 622 मद्यपी वाहनचालकांवर महाराष्ट्र पोलिसांनी कारवाई केली; परंतु त्यांनी ई–चलनाद्वारे पाठविलेल्या दंडाची रक्कम (2 कोटी 94 लाख!) अद्याप भरलेली नाही. इतर गुह्यांत अडकलेल्या वाहनचालकांचेही तेच आहे. नियतच साफ नाही, आपल्या चुका मान्य करायच्या नाहीत, कायदा पाळायचा नाही; त्यामुळे नवीन अमलात येणारे मोटार वाहन कायदे गुन्हेगारी प्रवृत्तीचे वाहनचालक किती पाळतील याबद्दल शंकाच वाटते. जेवढे कायदे कडक तितका भ्रष्टाचार अधिक! नवीन मोटार वाहन नियमांमुळे भ्रष्टाचार वाढेल, अशी शंका पोलीसच व्यक्त करीत आहेत.
कशाही गाड्या हाकायच्या, वाहतूक नियम तोडायचे, रॅश व जॉय रायडिंग करायची, निरपराध्यांचे बळी घ्यायचे हे कुठेतरी थांबले पाहिजे. पोलिसांनी कायद्याची कठोरपणे अंमलबजावणी करून बेशिस्त वाहनचालकांना आळा घातला पाहिजे. नियमांचे उल्लंघन करणार्या वाहनचालकांमुळे मुंबईत रोज सरासरी दोघांचा तरी बळी जातो. महाराष्ट्रात रोज 30 ते 35 जण अपघातात जीव गमावतात. मुंबईसह देशभरात हीच परिस्थिती आहे. वर्षाकाठी अपघातात जगभरात 10 लाख लोकांना आपले प्राण गमवावे लागतात. यावरून माणूसच माणसाच्या जीवावर उठला आहे हेच सिद्ध होते.


























































