माढा विधानसभेची जागा शिवसेनाच लढविणार व भगवा फडकविणार!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

माढा विधानसभेची जागा शिवसेनेची असून शिवसेनेचीच राहील. ही जागा शिवसेनाच लढविणार व भगवा फडकविणार, असे शिवसेना जिल्हा समनव्यक प्रा. शिवाजीराव सावंत यांनी आज ठणकावून सांगितले. ते माढा विधानसभा मतदारसंघाततील भाजपा शिवसेना महायुतीच्या कार्यकर्ता  महामेळावात बोलत होते.

तुळजाभवानी मंगल कार्यालयात महायुतीचा महामेळावा पार पडला. या वेळी बोलताना त्यांनी पुढे सांगितले की, शिवाजीराव सावंत गेले 25 वर्षे एकटे टक्कर देत आले आहेत. निवडणूक तीन वेळा लढलो. यश आले नाही.  पण धनुष्य बाण तालुक्यातील घराघरात पोहचवला. विद्यमान आमदारांना  सत्तेच्या मोह सुटत नाही. दररोज भाजपचे तर कधी शिवसेनेचे दार ठोठावितात. ही माढाची जागा शिवसेनेची आहे. शिवसेना लढणार आहे. पक्षश्रेष्ठीं निर्णय घेतील. युती निश्चित आहे. जागा वाटप करा. आपली जागा आपण सोडणार नाही. ही जागा शिवसेना लढविणारच. लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीत काम करा. मंत्री महोदय कामे मार्गी लावण्यासाठी जीवाचे रान करतात. सामान्य माणसाला पाणी मिळण्यासाठी धडपडत असतात. 25 वर्षांचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी शिवसेना ही जागा लढणार आहे.

यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब साठे, भाजप तालुका अध्यक्ष संजय कोकाटे, माजी समाज कल्याण सभापती शिवाजी राजे कांबळे, शिवसेना जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे, जलतज्ञ अनिल पाटील, लक्ष्मीकांत  ठोगे पाटील, मनोज शेजवाल, पृथ्वीराज सावंत, अतुल खूपसे, रयत क्रांतीचे जिल्हा अध्यक्ष प्रा. सुहास पाटील, विलासराव देशमुख, राजाभाऊ चवरे, आनंद कानडे, रिपब्लिकन पक्षाचे चंद्रकांत वाघमारे आदी महायुतीचे  पदाधिकारी उपस्थित होते.