भुलाबाईची लेखणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रा. डॉ. प्रकाश खांडगे

ज्येष्ठ लोकसाहित्यिका डॉ. सरोजिनी बाबर यांचे यंदा जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे. यानिमित्ताने 1 सप्टेंबर रोजी पुण्यात लोकसाहित्य संमेलन होते आहे…

सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक क्षेत्रात संपूर्ण देशाचे नेतृत्व करणारी पिढी स्वातंत्र्यपूर्व काळात महाराष्ट्रात निर्माण झाली. या पिढीने त्या त्या स्तरावर मराठी मुलूखात मंडळीकरण साधले. लोकसाहित्याच्या क्षेत्रात दोन महनीय विदुषींचे नाव आवर्जून घ्यावे लागते. डॉ. सरोजिनी बाबर आणि डॉ. दुर्गा भागवत, डॉ. बाबर यांनी लोकसाहित्याचे विपुल संपादन, संकलन केले तर डॉ. दुर्गा भागवत यांनी लोकसाहित्याला सैद्धांतिक बैठक प्राप्त करून दिले. शास्त्रापूत अभ्यासाच्या नव्या पिढीला त्यांनी सातत्याने मार्गदर्शन केले.

डॉ. सरोजिनी बाबर यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे. त्याचे औचित्य साधून लोकरंग सांस्कृतिक मंच, ठाणे, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, राष्ट्र सेवा प्रतिष्ठान, बावधन यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे येथील यशवंतरव चव्हाण नाटय़गृह, कोथरूड येथे 1 सप्टेंबर 2019 रोजी लोकसाहित्य संमेलन आयोजित होत आहे. या लोकसाहित्य संमेलनाच्या अध्यक्षा आहेत ज्येष्ठ कवयित्री आणि लोकसाहित्य – संत साहित्याचे गाढे संशोधक डॉ. रा. चिं. ढेरे यांच्या सुकन्या डॉ. अरुणा ढेरे. मिथकांचा विशेषतः रामायण, महाभारत पुराणातील स्त्री व्यक्तीरेखांशी निगडीत मिथकांचा लालितत्यपूर्ण, चिंतनगर्भ विचार डॉ. अरुणा ढेरे यांनी आपल्या कथा, कविता, कादंबऱया, ललित लेखनातून मांडला आहे. मग ती राधा असो, द्रौपदी असो, सत्यभामा, रुक्मिणी असो अथवा कुंती असो. या लोकसाहित्य संमेलनात मिथके आणि समकालीन प्रश्नांचा वेगळा धांडोळा डॉ. अरुणा ढेरे निश्चित घेतील.

डॉ. सरोजिनी बाबर यांच्या जन्म शताब्दीनिमित्त आयोजित होणाऱया या लोकसाहित्य संमेलनाच्या निमित्ताने सरत्या श्रावणात अन् उगवत्या भाद्रपदात त्यांनी संकलित आणि संपादित केलेल्या अनेक ग्रंथांचे स्मरण होते. भोंडला, मंगळागौर, जात्यावरच्या ओव्या, नागपंचमीची गीते, स्त्र्ायांचे खेळ असे मोठे स्त्र्ााrधन डॉ. बाबरबाईंनी आपल्या भगिनी डॉ. कुमुदिनी पवार, शरदिनी मोहिते यांच्या सहकार्याने एकत्र केले. दसरा-दिवाळी, आदिवासींचे सण उत्सव, राजविलासी केवडा, जा माझ्या माहेरा, एक होता राजा, कुलदैवत, वैजयंती, महाराष्ट्र लोकसाहित्य माला अशी विपुल ग्रंथसंपदा डॉ. सरोजिनी बाबर यांच्या नावे आहे.

7 जानेवारी 1920 रोजी सांगली जिल्हय़ातील वाळवे तालुक्यातील बागणी या गावी डॉ. सरोजिनी बाबर यांचा जन्म झाला. गुरुवर्य कृष्णराव भाऊराव बाबर आणि गंगुबाई यांचे हे पहिले अपत्य. फेर, झिम्मा, फुगडीचे वेड अगदी बालवयात त्यांना जडले. महाविद्यालयीन जीवनात बॅडमिंटन खेळणाऱया सरोजिनीबाई सातारा जिल्हय़ातील जरंडेश्वराचा डोंगर मोठय़ा हौसेन चढत. या जरंडेश्वराच्या डोंगराचे आणि महाराष्ट्र शाहीर पद्मश्री कृष्णराव साबळे यांचेही मोठे सख्य होते. टाळ-मृदुंगाच्या गजरात ते जरंडेश्वराला जात असत. शालेय शिक्षण पूर्ण केल्यावर पुण्यातल्या एसपी कॉलेजमध्ये सरोजिनीबाईनी प्रवेश घेतला. त्याच काळात त्या देशाच्या स्वांतत्र्य चळवळीकडे ओढल्या गेल्या. श्री.म. माटे यांच्यासारखा उदारमतवादी गुरू त्यांना लाभला. स्वातंत्र्य चळवळीतील सहभागामुळे त्यांना अटकही झाली. बी.ए.च्या परीक्षेत त्या प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या. पुढे त्या बी.टी. झाल्या. एम.ए., पीएच.डी. झालेल्या सरोजिनीबाईंनी खेडोपाडय़ातील लोकसाहित्य संकलित करण्याचा ध्यास घेतला. ही प्रेरणा त्यांना सानेगुरुजी यांच्याकडून मिळाली. पुणे विद्यापीठाने त्यांना डीलीट पदवी प्रदान केली. महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समितीच्या त्या 1961 ते 1993 या दीर्घ कालखंडात अध्यक्ष होत्या. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या त्या सदस्य होत्या. महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाचे सदस्यत्वही त्यांनी भूषविले होते. 1952 ते 1957 या कालावधीत त्या महाराष्ट्र विधानसभेच्या सदस्य होत्या. 1963 ते 1966 या कालावधीत त्या विधान परिषदेच्या सदस्य होत्या. 1968 ते 1974 या कालावधीत राज्यसभेच्या सदस्य होत्या. राजकीय कारकीर्द सुरू असतानाच त्यांची नाळ सातत्याने महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाशी जुळलेली होती. पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, बाबासाहेब पुरंदरे, वसंतदादा पाटील या मान्यवरांशी त्यांचा सतत संपर्क असायचा.

समाजशिक्षण मालेची 550 पुस्तके, सात कादंबऱया, 11 कथासंग्रह, 26 ललित लेखसंग्रह, चार नाटिका, दोन काव्यसंग्रह, लोकसाहित्य समितीची 30 प्रकाशने, मी पाहिलेले यशवंतराव, वसंतदादा गौरव ग्रंथ अशी विपुल ग्रंथसंपदा डॉ. सरोजिनी बाबर यांचे नावे आहे. मुंबई दूरदर्शनने डॉ. सरोजिनी बाबर आणि कवयित्री शांता शेळके यांच्या मुलाखतींची ‘रानजाई’ मालिका प्रसारित केली होती. 20 एप्रिल 2008 रोजी दीर्घ आजाराने सरोजिनी बाबर यांचे देहावसान झाले.

महाराष्ट्र लोकसाहित्य समितीच्या कार्याला दिशा देऊन लोकसाहित्य संकलनाचे भरीव काम त्यांनी केले. त्यांच्यामुळे लोकसाहित्याला जनसामान्यांमध्ये प्रतिष्ठा प्राप्त झाली. डॉ. सरोजिनी बाबर या लोकसाहित्य चळवळीच्या निश्चितच लोकनेत्या होत्या.

z [email protected]