
सर्व काही हातातून निसटत चाललं होतं. 11 वा फलंदाज जॅक लीच खेळपट्टीवर आला तेव्हा विजय आमच्यापासून 70 धावा दूर होता. फलंदाजीला आलेल्या लीच याला मी म्हटलं, ‘तू बाद होऊ नकोस, फक्त मला साथ दे, बाकी मी बघतो,’ लीचने साथ दिली म्हणून मी इंग्लंडला हा ऐतिहासिक विजय मिळवून देऊ शकलो, अशा शब्दांत विजयाचा शिल्पकार ठरलेल्या बेन स्टोक्सने प्रतिक्रिया दिली.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱया कसोटी क्रिकेट सामन्यातील संस्मरणीय विजयानंतर बेन स्टोक्स बोलत होता. तो म्हणाला, आज हरलो, तर मालिका जिंकता येणार नाही, एवढाच विचार डोक्यात घोळत होता. शेवटचा फलंदाज माझ्या साथीला आला तेव्हा आमच्यासाठी खरंच जिंकण्यासाठी परिस्थिती नव्हती. मात्र, लीचने साथ दिली, तर मी इंग्लंडला जिंकून देऊ शकतो, हा विश्वास मनात नक्की होता.
फ्राइड चिकन अन् चॉकलेट खाल्लं होतं!
एखाद्याने जर अचाट कामगिरी केली तर आपल्या तोंडातून सहज येते की ‘काय खाल्ल होतं याने काय माहीत’. बेन स्टोक्सच्या अफलातून फलंदाजीनंतर त्यालाही हाच प्रश्न विचारण्यात आला. बिकट परिस्थितीत तू झुंजार नाबाद 135 धावांची खेळी करून इंग्लंडला तारले, असं काय खाल्लं होतं म्हणून हे घडलं. त्यावर बोलताना स्टोक्स म्हणाला, रात्री मी फ्राइड चिकन अन् दोन चॉकलेट खाल्ली होती. सकाळी दोन कप कॉफी पिऊन खेळायला गेलो. खरं तर स्टोक्सने जे खाल्लं ते हाय कॅलरीज फूड आहे. खेळाडू असे फुड खाण्याचे सहसा टाळतात.


























































