
देशातील पहिली खासगी रेल्वे ‘तेजस एक्सप्रेस’ येत्या नोव्हेंबरपासून ‘मुंबई-अहमदाबाद’ या मार्गावर धावणार आहे. या गाडीत प्रवासादरम्यान मोफत चहा-कॉफी मिळणार असून तिकिटासोबतच प्रवाशांचा 50 लाखांचा विमाही उतरविण्यात येणार आहे. तसेच गाडीच्या वेळेत एका तासाहून अधिक विलंब झाल्यास प्रवाशांना भरपाईदेखील दिली जाणार आहे.
ऑक्टोबर महिन्यात पहिली तेजस एक्सप्रेस दिल्ली ते लखनौ या मार्गावर धावणार आहे. या गाडीचे किमान प्रवासी भाडे हे शताब्दी एक्सप्रेस एवढेच असेल. या खासगी ट्रेनचे वैशिष्टय़ म्हणजे प्रवाशांसाठी दोन वेळेस जेवणाची व्यवस्था, मोफत चहा-कॉफीसाठी वेंडिंग मशीन यांसारखी सुविधा असणार आहे. या एक्सप्रेसमध्ये ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे तिकिटात 40 टक्क्यांची सवलत दिली जाणार आहे.
- तेजस एक्सप्रेसचे प्रवासी भाडे शताब्दी एक्सप्रेस एवढेच असणार आहे. सीझनच्या काळात गर्दी लक्षात घेता तिकीट दरात बदल करण्यात येणार आहेत. तसेच अन्य दिवशी प्रवाशांना आकर्षिक करण्यासाठी तिकिटांच्या दरात खास सवलती दिल्या जाणार आहेत.
चार ऐवजी दोन टॉयलेट
तेजसमधील प्रत्येक कोचमध्ये केवळ दोनच टॉयलेट असणार आहेत. इतर रेल्वे गाडय़ांमध्ये एका कोचमध्ये चार टॉयलेटची सोय असते. कोचमध्ये अधिक मोकळी जागा मिळावी तसेच फूड सर्व्हिस मॅनेजमेंटसाठी हा बदल करण्यात आला आहे. रेल्वे मंत्रालय आयआरसीटीसीच्या या खासगी रेल्वेला मिळणाऱ्या प्रतिसादानुसार अन्य मार्गावर तेजस एक्सप्रेस सुरू करण्याचा विचार करीत आहे.





















































