
रेल्वे प्रवाशांच्या सोयीसुविधा वाढविण्यासाठी एरवी मॉल व विमानतळांवर दिसणारे आलिशान ‘सरकते जिने’ रेल्वे स्थानकांवर आता परिचयाचे झाले आहेत. या सरकत्या जिन्यांमुळे महिला व ज्येष्ठ प्रवाशांची चांगली सोय झाली असताना बहुतांशी वेळा हे जिने तांत्रिक बिघाडाने बंद होत असल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत मध्य रेल्वेने केलेल्या सर्वेक्षणात मध्य रेल्वेच्या ठाणे, दादर आणि कल्याण स्थानकांतील सरकते जिने सर्वाधिक काळ बंद राहत असून जिन्याचे आपत्कालीन बटण प्रवाशांकडून खोडसाळपणे वारंवार दाबल्यानेच बहुतांश जिने बंद पडत असले तरी आता सरकत्या जिन्यांचे महागडे पट्टे तोडण्याच्या घटनाही उघडकीस आल्याचे खळबळ उडाली आहे.
सरकत्या जिन्यांसदर्भात मध्य रेल्वेने जुलै महिन्यात सर्वेक्षण केले होते. त्यात ठाणे, दादर आणि कल्याण स्थानकांत अनुक्रमे दिवसातून 361, 223 आणि 104 वेळा बंद पडल्याचे उघडकीस आले. त्यानंतर मानखुर्दचा जिना दिवसातून 56 वेळा तर त्याखालोखाल चेंबूर येथील जिना 16 वेळा बंद पडला. काही अपघात झाला तर सरकत्या जिन्याला थांबविण्यासाठी लाल रंगाचे इमर्जन्सी बटण सरकत्या जिन्याच्या पायऱयांजवळ देण्यात आले आहे.
सरकत्या जिन्यांवर लक्ष ठेवण्यासाठी त्यांचा गैरवापर टाळण्यासाठी रेल्वेला जादा मनुष्यबळ तैनात करावे लागत आहे. जर सरकता जिना चुकून हे इमर्जन्सीचे बटण दाबल्याने जरी बंद झाला असेल तरी रेल्वे कर्मचारी पोहचेपर्यंत तो बंदच राहतो. त्यात लंच टाइम झाला असेल तर आणखी वेळ लागतो असे एका अधिकाऱयाने स्पष्ट केले.
4.61 लाखांचा भुर्दंड
13 ऑगस्ट रोजी दादरच्या सरकत्या जिन्याचा अज्ञाताकडून पट्टाच तोडल्याने मध्य रेल्वेला 4.61 लाखांचा भुर्दंड पडला आहे. त्यामुळे हा जिना दुरुस्त करण्यास आणखी काही अवधी लागणार आहे. असाच प्रकार मुलुंड व ठाणे येथेही घडला होता.



























































