>> विद्या कुलकर्णी, [email protected]
हिरवागार पोपट अनेक रंग स्वतःवर पांघरतो. पाहुया निसर्गाची किमया.
हिंदुस्थानी पौराणिक कथा व लोककथांमध्ये पोपटाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. पोपटाचे हिरवे पंख व लाल चोच हे प्रजननाचे दर्शक आहेत. लाल चोच ही पावसाला आसुसलेल्या पृथ्वीचे व हिरवे पंख पावसाने तृप्त झालेल्या पृथ्वीचे, आनंदाचे प्रतिनिधित्व करतात. म्हणूनच पोपट हे कामदेवाचे प्रतीक, वाहन आहे. भारतात पोपटाच्या उपजाती असून त्यांना पॅराकिट म्हणतात.
सिट्टॅसिडी या पक्षिकुळातील पक्ष्यांना सर्वसाधारणपणे ‘पोपट’ हे नाव दिलेले आहे. या कुळात 82 वंश आणि त्यांच्या 316 प्रजाती आहेत. हे पक्षी उष्ण, उपोष्ण व थंड प्रदेशातही राहणारे आहेत.
हे पक्षी विविध रंगांचे व आकारमानाचे असले तरी शरीर रचनेच्या दृष्टीने त्यांच्यात खूपसे साम्य असते. चोच आखूड, मजबूत व बाकदार असते. मान आखूड व शरीर आटोपशीर असल्यामुळे हे पक्षी गुबगुबीत दिसतात. यांचे पंख मजबूत व गोलसर असतात. हे पक्षी अतिशय वेगाने उडू शकत असले तरी त्यांना फार दूरवर उडता येत नाही. काही पोपटांची शेपटी आखूड तर काहींची बरीच लांब असते. पायाच्या चार बोटांपैकी दोन पुढे व दोन मागे असतात आणि त्यांवर बारीक खवले असतात. बहुतेक जातींच्या पोपटांचे रंग भडक असतात. सामान्यतः हिरव्या रंगाचे असले तरी काही जाती बहुरंगी असतात. पोपट झाडांवर राहणारे पक्षी आहेत.
पोपट मुख्यतः शाकाहारी आहेत, पण क्वचित प्रसंगी किडेही खातात. निरनिराळे धान्ये आणि सर्व प्रकारची लहानमोठी फळे हे त्यांचे मुख्य खाद्य आहे. फुलातील मधही ते शोषून घेतात.
झाडाच्या ढोलीत अथवा भोकांत, घरांच्या भिंतीमधील भोकांत अथवा कधीकधी खडकांच्या कपारीत पोपट घरटी करतात. मादी भोकाच्या आतल्या मोकळ्या जागेत अंडी घालते. काही जाती तर वाळवीच्या वारुळात अंडी घालतात. मादी दर खेपेस 2–5 अंडी घालते. नर व मादी आपल्या अन्नपुटातले अर्धवट पचलेले शाकान्न बाहेर काढून त्यांना भरवितात. पोपट 30 ते 40 वर्षे जगतात. काही पोपट 80 वर्षे जगल्याचीही नोंद आहे.
करण पोपट
हे पोपट आकाराने सर्वात मोठे असून यांचा रंग प्रामुख्याने हिरवा असून गालावर व मानेच्या मागच्या बाजूला फिक्कट निळ्या-राखाडी रंगाची झलक असते. पोटाचा रंग पिवळा-हिरवा असून खांद्यांवर लाल रंगाचे पट्टे असतात. यांची चोच मोठी असून ती लाल रंगाची असते व टोकं पिवळ्या रंगाची असतात. नराच्या गालाच्या खालील बाजूस काळा पट्टा असतो व मानेच्या मागील बाजूस गुलाबी रंगाचा पट्टा असतो. प्रजननाच्या काळात नराच्या पंखांच्या आतील बाजूला जांभळ्या रंगाची छटा येते.
निळ्या पंखाचा पोपट
हे पक्षी निळसर-राखाडी रंगाचे असतात. शेपटी लांब असून टोकं पिवळी असतात. नर व मादी, दोघांच्याही मानेभोवती काळ्या रंगाची कॉलर असते व खालील बाजूस नराला निळ्या-हिरव्या रंगाची किनार असते. चोच लाल रंगाची असते. मादीची चोच काळ्या रंगाची असते.
टोई पोपट
टोई पोपट मुख्यत्वे हिरव्या रंगाचे असून s. नराचे डोकं लाल रंगाचे असून मागील बाजू जांभळा-निळ्या रंगाची असते. मानेवर काळ्या रंगाची कॉलर असून खालील बाजूवर हिरव्या रंगाची छटा असते. खांद्यांवर लाल रंगाचे पट्टे असतात. मादीचे डोके निळ्या-राखाडी रंगाचे असते. मादीला मानेवर कॉलर नसते. नराची चोच नारिंगी-पिवळ्या रंगाची तर मादीची चोच फिक्कट पिवळ्या रंगाची असते.
पिचू पोपट
नराची चोच व पार्श्वभाग लाल रंगाचा असतो. गळ्यावर निळ्या रंगाचा पट्टा असतो. मादीच्या गळ्यावर हिरव्या रंगाचा पट्टा असतो.माझे लहानपण मुंबईत गेल्यामुळे पोपटाचे इतके विविध प्रकार असतात याची पुसटशीही कल्पना नव्हती, फोटोग्राफीच्या छंदामुळे हिंदुस्थानातील अनेक प्रकारचे पोपट पाहावयास मिळाले.






















































