
सर्जेकोट कवडा रॉक लगतच्या समुद्रात मासेमारीस गेलेली नौका शुक्रवारी (30) पहाटे जोरदार वारा व लाटांच्या तडाख्यात भरकटल्याची घटना घडली.
दरम्यान, नौकेतील तीन खलाशी सुदैवाने बचावले. भरकटलेली नौका तळाशील समुद्रकिनारी आढळून आल्यानंतर तळाशील, सर्जेकोट व कोळंब येथील ग्रामस्थांनी नौका बाहेर काढली. मात्र नौकेवरील मच्छीमारी जाळी तुटून तसेच इंजिनचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.
मालवण सर्जेकोट येथील हेमंत दत्ताराम पाटील यांच्या मालकीची ‘शिवशक्ती’ ही मासेमारी पात (नौका) घेऊन गणेश हडकर, नारायण गोसावी, बबन पराडकर हे तिघे खलाशी मासेमारी करण्यासाठी गेले होते. सर्जेकोट कवडा रॉक येथे मासेमारी करण्यासाठी नौकेतील नांगर समुद्रात नांगरून ठेवला होता. यावेळी समुद्रात अचानक वाऱ्याने व समुद्री लाटांनी रौद्ररूप धारण केल्याने रात्रीच्या सुमारास मासेमारी नौका समुद्रात भरकटली.
नौका भरकटल्याचे समजताच खलाशी भयभीत झाले. यावेळी नौकेमध्ये पाणी भरत असल्याचे पाहून त्यांनी नौकेतील पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. व मच्छीमारी जाळी नौकेत ओढून घेतली. यात जाळी तुटून गेली तर नौकेचे इंजिनचे नुकसान झाले. शुक्रवारी सकाळी ही भरकटलेली नौका तळाशील समुद्रकिनारी स्थिरावली. नौकेवरील खलशानी मालक हेमंत पाटील यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर तळाशील, सर्जेकोट व कोलंब येथील ग्रामस्थानी प्रसंगावधान राखून नौका सुखरूप बाहेर काढली. दरम्यान गेले दोन दिवस मालवण किनारपट्टीवर पावसाचा जोरही वाढला आहे.
































































