
>> धनश्री देसाई (तोडेवाले)
गणपतीची रूपं अनेक… कुठे साकार रूप घेऊन तर कुठे स्वयंभू म्हणून. माती, संगमरवरातील, दगडी प्रतिमा आपण पाहतोच. पण काही विशिष्ट झाडांतून, वनस्पतींतून गणपतीची स्वयंभू प्रतिमा अवतरलेली दिसून येते. असेच एक उदाहरण म्हणजे आकडय़ाच्या झाडापासून अवतरलेला गणराज. मध्य प्रदेशात रुईच्या झाडाला आकडा म्हणतात. असं म्हणतात की, या रुईच्या मुळात 8 वर्षांनी गणपती तयार होतो. जिथे हे झाड असतं तिथे साधारण 8 वर्षांनी मूळ उपटून बघितल्यास गणपतीचा आकार घेतलेली आकृती असते. ही आकृती म्हणजे जणू गणपतीची मूर्तीच.
“सर्वांचे लाडके दैवत कुठले?’’ म्हटल्यावर ‘‘बाप्पा’’च तोंडातून पटकन निघते.. बरोबर ना?
सर्व ब्रह्मांडात पूजनीय, वंदनीय असा गणराज येण्याची चाहूल लागलीय. वर्षभराचे गाऱहाणे, मागणे, राग-लोभ… सगळं घेऊन बसलेलो असतो आपण. तो बाप्पा येईल आणि सगळं नीट करेल ही श्रद्धाच इतकं सुखावून देणारी, बळ देणारी असते की, सर्व त्रासातून आपण मुक्त होणारच याची आपल्याला खात्री असते.
गणपतीमध्ये आपण अनेक गणपतींच्या देवस्थानी जातो. अनेक नवसाला पावणाऱया गणपतींच्या दर्शनास जातो आणि वेगवेगळ्या मोहक रूपांत त्या गणरायाला बघून भारावून जातो. मूर्तिकाराचे मनोमन आभार मानतो की, त्याने निराकाराला आकार देऊन आमच्यावर किती मोठी कृपा केलीय.
गणपतीची माया पण बघा ना! कुठे साकार रूप घेऊन उभे होतात आणि कुठे स्वयंभू म्हणून. माती, संगमरवरातील, दगडी प्रतिमा आपण पाहिल्याच असणार, पण एका विशिष्ट स्वयंभू गणपतींची आज तुम्हाला भेट करवून देते. ते म्हणजे आकडय़ाच्या झाडापासून अवतरलेला गणराज. मध्य प्रदेशात रुईच्या झाडाला आकडा म्हणतात. असं म्हणतात की, रुईच्या मुळात 8 वर्षांनी गणपती तयार होतो. जिथे हे झाड असतं तिथे साधारण 8 वर्षांनी मूळ उपटून बघितल्यास गणपतीचा आकार घेतलेली आकृती असते. जणू गणपतीची मूर्तीच आहे.
असाच एक रुईच्या मुळापासून प्रकट झालाय स्वयंभू गणपती.
इंदूरच्या स्नेहलतागंजमध्ये राहणाऱया जोशी कुटुंबाच्या घरी प्रकट झालाय रुईच्या झाडातील गणपती. त्यांच्या अंगणात गाजर घास (गाजर गवत) उगवलेले होते. याला काँग्रेस गवतही म्हणतात आपल्याकडे. तर त्यातच हे रुईचे झाडही होते. तसंही रुईचे झाड सगळीकडेच बघायला मिळते. त्यांच्या अंगणात आलेले ते रुईचे झाड त्यांनी बघितले आणि त्याच वेळी इंदूरच्या एका भागात 1984 साली रुईचे गणपती मिळाले तेव्हा हे जोशी कुटुंब कुतूहल म्हणून तिथे दर्शनाला गेले असता तिथल्या एका व्यक्तीने त्यांना आवाज दिला. म्हणाले की, तुमच्याकडेही गणपती येणार अशी आज्ञा आहे. तेव्हा ते झाड तुम्ही कापू नका.
हे ऐकल्यावर त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. मग त्यांनी त्यांची भेट घेऊन आपण झाड कापणार नाही असं ठरवलं आणि आाठ-नऊ करता करता चक्क 15 वर्षे उलटून गेली. छोटय़ा झाडाचे मोठे वटवृक्षच झाले जणू! रुईच्या झाडाचा नाजूकपणा नव्हताच त्याला. तरीही जोशी कुटुंबाने ठरवलं की, आपल्याला आज्ञा झाल्याशिवाय झाड कापायचे नाहीच. त्यांच्याकडे घरच्या अंगणातच छोटंसं मंदिर होतं. त्यात शिवलिंग ठेवलं होतं आणि शेजारी वगैरे राहणारे किंवा गल्लीतले त्यांच्याकडे येऊन शिवलिंगाची उपासना करायचे. एकदा एक कुटुंब पूजेला आले असताना शिवलिंग सापडले नाही म्हणून शोधाशोध सुरू झाली. अचानक बायकोच्या तोंडून निघाले की, शंकरजी बेटे की अगुवानी में गये होंगे. म्हणजे गणपती येणार म्हणून वडील घ्यायला गेले असणार आणि खूप शोधाशोध करून शेवटी शिवलिंग झाडाच्या मुळाशी सापडले. तरीही जोशी कुटुंब अजून वाट बघावी असं मनाशी निश्चय करून बसलेले. एक दिवस त्यांच्या शेजारी राहणाऱया एक महिलेने त्यांना सांगितले की, तिच्या स्वप्नात गणपती आले. म्हणाले, मला बाहेर काढा. तेव्हा त्यांनी ठरवले की, खोदकाम सुरू करावे. म्हणून झाड कापणारे बोलावले, पण त्यांच्याकडून काही झाले नाही. मग एक भीती ही होती की, खोदताना काही भग्न नको व्हायला. मग त्यांनी स्वतःच जप करत कुटुंबासहित खोदकाम सुरू केलं आणि सकाळी 10 वाजता सुरू करून संध्याकाळी 4 वाजता मूळ सापडलं. जेव्हा सबंध मूळ बाहेर आलं तेव्हा चकित करणारे दृश्य होते. कारण त्या मुळात एक गणपती नसून पंचमुख असणारे गणपती होते. मग त्यांनी याबद्दल विचारणा केली तेव्हा कळले की, पंचमुखी गणपती रुईच्या झाडाच्या मुळातून हिंदुस्थानात कुठेच प्रकट झालेला नाही. आता या पंचमुखी गणपतीची प्राणप्रतिष्ठा करण्याचे ठरवले आणि मग विधिविधान पाळून देवळात त्याच अंगणात जिथे रुईचे झाड होते तिथेच देऊळ बांधले गेले.
सुरुवातीच्या काळात या गणपतीचे फोटो काढले तरी ते फोटो यायचे नाहीत. अनेक मीडियातल्या लोकांनी ही प्रचीती घेतली की, फोटो क्लिक होतो, पण पिक्चर येत नाही. मग काही वर्षांनी अनेक अभिषेक झाले. त्यानंतर आता फोटो येतात.
पंचमुखी गणपतीची विशेषता म्हणजे सर्वांचे मुख एक गोल मंडळ करून आहे. म्हणजे कुठल्याच गणपतीची पाठ दिसत नाही. असं म्हणतात की, गणपतीच्या पाठीशी दळिद्र असतं. त्याच्या मुखासमोर काही टिकत नाही. घरादारात लावणारे गणपती म्हणूनच आत प्रवेश करताना असतात. म्हणजे दळिद्र घराबाहेर राहते.
आपण गणपतीला एकदंत म्हणतो, किंतु या गणपतीमध्ये काही एकदंत आहे व काही द्विदंती आहे. आणखी विशेषता म्हणजे सगळे सरळ सोंडेचे आहेत. मी स्वतः या गणपतीचे दर्शन घेतलेले आहे. अनेक लोक त्यांची कीर्ती ऐकून लांबून दर्शनाला येतात. असा हा विशिष्ट आणि नवसाला पावणारा इंदूरचा रुईच्या झाडापासून प्रकटलेला गणपती आपणा सर्वांना निरोगी ठेवो आणि मनोकामना पूर्ण करो हीच सदिच्छा!
























































