काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मेगा गळती सुरू आहे -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची हवा संपलेली आहे. हे सांगण्यासाठी कोणत्याही ज्योतिषाच गरज नाही, तुमच्या पाठीशी कुणीही उभे राहणार नाही अशी टिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्यावर केली. लातूर येथील शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, खासदार सुधाकर शृंगारे, आमदार सुधाकर भालेराव, सुरजीतसिंह ठाकूर, विनायक पाटील, अभिमन्यू पवार, गोविंद केंद्रे, नागनाथ निडवदे यांच्यासह इतरांची उपस्थिती होती.

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आता बी टीम आहे, वचिंत ए टीम असल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्यासंदर्भात काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री ज्योतिषी झाले आहेत का अशी टीका केली, तर बाळासाहेब थोरात यांनी आरशात पाहावे असा सल्ला दिला होता. या संदर्भात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची हवा आता संपलेली आहे, हे सांगण्यासाठी कोणत्याही ज्योतिषाची गरज नाही. सर्वसामान्य माणसाला हे समजत आहे. तुमच्या पाठीशी कुणीही उभे राहणार नाही. आम्हाला आरशात पाहण्याची गरज नाही, आम्ही आरसा पाहात नाही तर आम्ही लोकांच्या चेहऱ्यावर पाहतो. आरशात पाहण्याची वेळ आता कुणावर आली आहे हे सांगण्याची आता गरज नाही असा टोलाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

मुख्यमंत्री म्हणाले की, भाजपामध्ये मेगा भरती सुरू नाही तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ‘मेगा गळती’ सुरू आहे. आम्ही निवडक लोक घेत आहोत. युतीचा विचार करूनच प्रवेश दिला जात आहे. एखाद्या ठिकाणी प्रश्न निर्माण झालाच तर तो चर्चेतून सोडवला जाईल. अजून 4 ते 5 जणांना प्रवेश देण्यात येईल असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. मूळ भाजपातील 97 ते 98 टक्के लोक आहेत, केवळ 2 टक्केच इतर पक्षातील आहेत. त्यामुळे अडचण येणार नाही. शक्तीसंचय केला पाहिजे, यासाठीच प्रवेश दिले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.