बुम बुम बुमराह..! विंडीजविरुद्ध घेतली हॅटट्रीक, केली अनोख्या विक्रमांची नोंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टीम इंडिया आणि विंडीजविरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीत वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराहने हॅटट्रीकची नोंद केली. सबीना पार्क मैदानावर सुरू असलेल्या कसोटीत बुमराहने नवव्या षटकातील तीन चेंडूवर विंडीजचे तीन खेळाडू बाद केले. नवव्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर डॅरेन ब्रावो, तिसऱ्या चेंडूवर शाहमार ब्रुक्स आणि चोथ्या चेंडूवर रोस्टन चेज या खेळाडूंना बुमराहने पवेलियनचा रस्ता दाखवला. यासह कसोटी क्रिकेट इतिहासात बुमराहने आपले नाव सुवर्णाक्षरांनी लिहिले.

कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडियाकडून हॅटट्रीकची नोंद करणारा बुमराह तिसरा गोलंदाज आहे. यापूर्वी फिरकी गोलंदाज हरभजन सिंह याने 2001 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध हॅटट्रीकची नोंद केली होती. कोलकातात झालेल्या लढतीत भज्जीने रिकी पॉन्टिंग, अॅडम गिलख्रिस्ट आणि शेन वॉर्न यांना लागोपाठच्या चेंडूवर बाद करत कसोटीत टीम इंडियाकडून पहिल्या हॅटट्रीकची नोंद केली. यानंतर वेगवान गोलंदाज इरफान पठाण याने 2006 साली कराचीत पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत सलमान बट्ट, युनिस खान आणि मोहम्मद युसूफ यांना बाद करत हॅटट्रीकची नोंद केली.

अनोख्या विक्रमांची नोंद

  • इरफाननंतर हॅटट्रीक घेणारा बुमराह टीम इंडियाचा तिसरा खेळाडू ठरला. तब्बल 13 वर्षानंतर टीम इंडियाच्या गोलंदाजाने अशी कामगिरी नोंदवली.
  • कसोटी क्रिकेटमधील बुमराहने घेतलेली हॅटट्रीक 44 वी आहे.
  • आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये दोन वर्षांनी हॅटट्रीकची नोंद झाली. 2017 साली मोईन अलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध हॅटट्रीक नोंदवली होती.
  • वेस्ट इंडीजमध्ये ही तिसरी हॅटट्रीक असून कॅरेबियन मैदानावर हॅटट्रीक घेणारा बुमराह हिंदुस्थानचा पहिला गोलंदाज आहे.
  • डीआरएसच्या मदतीने हॅटट्रीक मिळण्याची ही तिसरी वेळ आहे. याआधी रंगना हेराथने 2016 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध आणि मोईन अलीने 2017 साली आफ्रिकेविरुद्ध डीआरएसच्या मदतीने हॅटट्रीक मिळवली.