1 आठवड्यात चोरीचे 3 प्रयत्न, सुरक्षारक्षकांनी चोरट्याला रंगेहाथ पकडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईच्या मुलुंडमध्ये चोरांनी उच्छाद मांडला आहे. इथल्या मिनर्व्हा इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये असलेल्या रहिवासी इमारतींमध्ये घुसण्याचे चोरट्यांनी एकाच आठवडयात तीनवेळा प्रयत्न केले आहेत. सोमवारी पहाटे 3 ते 4 चोरांनी ट्युलिप नावाच्या इमारतीमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला. या इमारतीच्या शेजारी दुसऱ्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या परिसरात घुसून तिथलं साहित्य चोरण्याचा या चोरांचा प्रयत्न होता.  या इमारतीच्या सुरक्षारक्षकांना हे चोरटे दिसले. त्यांनी यातल्या एका चोराला पकडून ठेवले आणि पोलीस येईपर्यंत त्याला बांधून ठेवले.

मुलुंडमधल्या पुरषोत्तम खेराज रस्त्यावरील एका गल्लीमध्ये तीन रहिवासी इमारती आहेत. या रस्त्यावर पथदिवे लावलेले नाहीत, याबाबत इथल्या रहिवाशांनी अनेकदा तक्रारी केल्या आहेत. रस्ता खासगी असल्याने इथे पथदिवे लावता येणार नाही असं त्यांना सांगण्यात आलं आहे. या भागामध्ये अजूनही छोटे उद्योग चालतात. त्यांचे कारखाने रात्री 9-10 नंतर बंद होतात. यामुळे या भागात फारशी जाग नसते. याचा फायदा उचलत दारू-सिगारेट पिणारे तरुण अंधाऱ्या कोपऱ्यात जागा पकडून रात्री उशिरापर्यंत बसलेले असतात. पोलिसांना विनंती करूनही या भागात गस्त वाढवण्यात आलेली नाहीये.

रात्रीच्या वेळी अंधारी गल्ली, मोठाले खड्डे यामुळे या रस्त्यावरून जाण्यास नागरीक घाबरायला लागले आहेत. पोलिसांनी या भागावर लक्ष ठेवावं अन्यथा इथे गुन्ह्यांचं प्रमाण वाढत जाईल अशी भीती यापूर्वीही इथल्या रहिवाशांनी व्यक्त केली होती. ती आता खरी ठरायला लागल्याने आता तरी पोलिसांनी इथे गस्त वाढवावी अशी पुन्हा एकदा मागणी रहिवाशांनी केली आहे.