ICJ मध्ये जाण्यासाठी कश्मीरबाबत पुरावे नाहीत; पाकिस्तानच्या वकीलाची कबूली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू कश्मीरच्या मुद्द्यावर पाकिस्तानला सतत तोंडघशी पडावे लागत आहे. जम्मू कश्मीरमधून कलम 370 रद्द करणे ही हिंदुस्थानची अंतर्गत बाब असूनही पाकिस्तानने कांगावा करत हा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर उपस्थित करण्याचा अनेकदा प्रयत्न केला. मात्र, कोणत्याही देशाचा पाठिंबा त्यांना मिळाला नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर आलेल्या अपयशामुळे निराश झालेल्या पाकड्यांनी हा मुद्दा आंतरराष्ट्रीय न्यायालयात उपस्थित करण्याचे म्हटले होते. मात्र, या मुद्द्यावर पाकिस्तानच्या वकिलाने केलेल्या वक्तव्यांमुळे पाकिस्तान पुन्हा एकदा तोंडावर आपटला आहे. हे प्रकरण आंतरराष्ट्रीय न्यायलयात (ICJ) उपस्थित करण्यासाठी ठोस पुरावे नसल्याचे वकिलाने स्पष्ट केले आहे.

जम्मू कश्मीरमध्ये नरसंहार आणि मानवी हक्कांची पायमल्ली होत असल्याचे आरोप आपण करत आहोत. मात्र, त्याबाबतचे पुरावे जमवणे कठीण आहे. याबाबतचे पुरावे नसतील तर हे प्रकरण आयसीजेमध्ये दाखल करणे कठीण होणार असल्याचे आंतरराष्ट्रीय न्यायालयातील पाकिस्तानचे वकील खावर कुरैशी यांनी सांगितले. याआधी पाकिस्तानने हे प्रकरण संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत उपस्थित करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यांच्या पदरी निराशाच पडली. मालदीवच्या संसदेत हा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला असता पाकिस्तानला हिंदुस्थानने धोबीपछाड दिली. त्यामुळे हा मुद्दा आंतरराष्ट्रीय न्यायालयात नेणार असल्याचे पाकिस्तानने म्हटले होते.  हिंदुस्थानी नौदलाचे अधिकारी कूलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने हिंदुस्थानच्या बाजूने फैसला सुनावत कूलभूषण यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थिगिती दिली होती. तसेच कूलभूषण यांना न्यायालयाच्या निर्देशानुसार कॉउन्सिलर अॅक्सेसही मिळाला आहे. त्यामुळे पुरावे नसताना कश्मीरप्रश्नी आंतरराष्ट्रीय न्यायालयात गेल्यास पाकिस्तानला तोंडघशी पडावे लागेल, असे संकेत कुरैशी यांनी दिले आहेत. करैशी यांनी केलेल्या या वक्तव्यांमुळे पाकिस्तान तोंडावर आपटला आहे.