
पुण्यातील सात खेळाडूंची महाराष्ट्र राज्य सब-ज्युनिअर (14 वर्षांखालील) फुटबॉल संघात निवड करण्यात आली आहे. वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन तर्फे घेण्यात येणाऱ्या पश्चिम विभाग सब-ज्युनिअर राष्ट्रीय फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राचा संघ सहभागी होणार आहे.
वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे कोषाध्यक्ष प्यारेलाल चौधरी आणि पुणे जिल्हा फुटबॉल संघटनेचे सचिव प्रदीप परदेशी यांनी निवड झाल्याचे जाहीर केले. पुण्याचे व्यंकट नवीन, राजवर्धन पाटील, हर्षवर्धन धुमाळ, अकीब अन्सारी, यश परदेशी, जतिन गुलवानी आणि अर्ष बागवान या सात खेळाडूंची महाराष्ट्र संघात निवड करण्यात आली आहे. पुण्याचे सॅव्हिओ डिसुझा यांची सहायक प्रशिक्षक म्हणून निवड झाल्याचेही त्यांनी सांगितले.
व्यंकट नवीन, राजवर्धन पाटील, हर्षवर्धन धुमाळ आणि अकीब अन्सारी यांची आघाडीच्या फळीमध्ये निकड करण्यात आली असून, यश परदेशी, जतिन गुलवानी आणि अर्ष बागवान यांची रक्षक फळीमध्ये निवड करण्यात आली आहे. मुंबईमध्ये ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ामध्ये निवड शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामधून राज्याचा अंतिम संघ निवडण्यात आला. मध्य प्रदेश येथे 7 ते 12 सप्टेंबर या दरम्यान होणाऱ्या पश्चिम विभाग सब-ज्युनिअर राष्ट्रीय फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राचा संघ सहभागी होणार आहे.






























































