Exclusive! एसटीची वीजेवर धावणारी पहिली ‘शिवाई’ बस मुंबईत दाखल, ही आहेत वैशिष्ट्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील एसटीच्या प्रवाशांचा प्रवास सुकर, पर्यावरण पूरक करण्यासोबतच खर्च आटोक्यात आणण्यासाठी विजेवरील बस (इलेक्ट्रिक ) चालवण्याचा प्रस्ताव एसटी महामंडळाने तयार केला होता. त्यानुसार काही बसेस सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात एसटीच्या ताफ्यात दाखल होणार असे सांगितले जात होते. त्यावर आता शिक्कामोर्तब झाले असून पहिली इलेक्ट्रिक बस मुंबईत दाखल झाली आहे.

गुरुवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते “शिवाई” विद्युत बसचे उद्घाटन करण्यात आले. ही बस देशातील प्रथम आंतर शहर विद्युत बस आहे. इलेक्ट्रिक बस एकदा चार्ज केल्यानंतर 300 किमीचा पल्ला गाठणार असून या बसच्या वापरामुळे प्रदूषणात घट होणार आहे.

पेट्रोल आणि डिझेल सारख्या इंधनाच्या वाढत्या किंमती आणि इंधनामुळे वाढत्या प्रदुषणामुळे केंद्र सरकारच्या आवाहनास प्रतिसाद देत राज्याचे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांच्या निर्देशानुसार महामंडळाने विजेवर चालणाऱ्या इलेक्ट्रिक 150 बस घेण्याचा प्रस्ताव मांडला. त्यासाठीची निविदा प्रक्रिया नुकतीच पूर्ण करण्यात आली आहे.

ही आहेत वैशिष्ट्य

  • या इलेक्ट्रिक बसचे नामकरण ‘शिवाई’ असे करण्यात आले आहे
  • वाहनांची लांबी 12 मीटर असून रुंदी 2.6 मीटर तर उंची 3.6 मीटर इतकी आहे
  • वाहन चालवण्यासाठी 322 किलो वॅट क्षमतेची लिथिअम आयर्न फॉस्फेटची बॅटरी वापरण्यात आली आहे
  • वाहनाची आसन क्षमता 43 +1 इतकी असून त्यांना पूशबॅक स्वरुपाची आरामदायी आसने लावण्यात आली आहे
  • ही बस वातानुकुलीत असून 36 किलो वॅट क्षमतेची वातानुकुलीत यंत्रणा लावण्यात आली आहे
  • ही बस एकदा चार्ज केल्यानंतर कमीत कमी 300 किमी चा पल्ला गाठणार आहे
  • बस 1 ते 5 तासांत चार्ज होणार आहे
  • इलेक्ट्रीक बसच्या वापरामुळे प्रदूषणात घट होणार आहे
  • शिवाई चालवण्यासाठी खर्च शिवशाही चालवण्यासाठी लागणाऱ्या खर्चापेक्षा अधिक तर शिवनेरी पेक्षा कमी असणार आहे