मुंबईत बनावट टेलिफोन एक्सचेंज चालवणारा हैदराबादेत सापडला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई शहरात बेकायदेशीरपणे आंतरराष्ट्रीय टेलिफोन एक्स्चेंजचा गोरखधंदा चालविणाऱया सातजणांच्या टोळीला जेरबंद केल्यानंतर दहशतवादविरोधी पथकाने त्या टोळीच्या आणखी एका मुख्य आरोपीला अटक केली. गेल्या महिन्यात एटीएसने मुंबईत विविध ठिकाणी छापा मारून हे बनावट कॉल सेंटर उद्ध्वस्त केले होते. त्यावेळी आठवा आरोपी पसार झाला होता. त्याला अखेर हैदराबादमध्ये पकडून मोठय़ा प्रमाणात विविध प्रकारचे साहित्य जप्त केले.

मुंबईत बेकायदेशीर आंतरराष्ट्रीय टेलिफोन एक्स्चेंज चालवले जात असल्याची खबर एटीएसला मिळाली होती. त्यानुसार एटीस प्रमुख देवेन भारती तसेच जयंत नाईकनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची सात पथके तयार करून शिवाजीनगर, डोंगरी, कल्याण, मस्जिद बंदर, वरळी, पनवेल या ठिकाणी बेकायदेशीर सुरू असलेल्या कॉल सेंटरवर छापे टाकले. त्या ठिकाणी इंटरनेट पॅकेटस्चे व्हॉईस कॉलमध्ये रूपांतर करून ते कॉल पुढे इच्छित ठिकाणी पाठविण्यासाठी इंटरनेट प्रोटोकॉल व पीआरआय लाइन्सचा वापर केला जात असल्याचे आढळले. तसेच त्या पाच ठिकाणी डेल कंपनीचा सर्व्हर, विविध कंपन्यांचे नऊ सिम बॉक्सेस, 513 सीमकार्ड, तीन लॅपटॉप, चार डेक्सटॉप, सात वाय-फाय राऊटर्स, दोन टरमिनेटिंगचे स्विचेस आणि 11 मोबाईल फोन असे साहित्य सापडले, तर नाझीम खान (29), मोहम्मद फैजल सिमोहम्मद फैजल सिद्दिक बाटलीवाला ऊर्फ अकबर (40), समीर दरवेज (30), मोहम्मद हुसेन बसारतअली सय्यद (39), मंदार आचरेकर (36), सिब्तेन अब्दुल कादर मर्चंट (33) आणि इम्तियाज शेख (38) अशा सातजणांना अटक केली होती.

छापा पडताच मुंबई सोडली
एटीएसकडून छापे टाकले जात असताना या टोळीचा आणखी आरोपी रफिक शेख हा तेव्हा मुंबईबाहेर पसार झाला होता. बनावट कॉल सेंटर चालविण्याचे प्रमुख काम रफिक करीत होता. शिवाय तो मुंबई गुन्हे शाखेच्या एका गुह्यातदेखील पाहिजे होता. त्यामुळे त्याचा शोध सुरू असताना तो हैदराबादेत असल्याची खबर एटीएसला मिळाली. त्यानुसार तेथे जाऊन रफिकला अटक करण्यात आली.

मोठय़ा प्रमाणात इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त
रफिकला अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडून बेकायदेशीर कॉल करण्यासाठी लागणारे सिमपूल मशीन-6, वेगवेगळ्या कंपनीचे सर्व्हर-7, सीमकार्ड-2126, सीमबॉक्स-46, मोबाईल-33, डेक्सटॉप-4, लॅपटॉप-8, राऊटर्स-8, राऊटिंग स्विचेस-5 असे महत्त्वाचे साहित्य जप्त केले.