Breaking : वंचित आघाडीत ‘बिघाडी’, एमआयएमचा स्वबळाचा नारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वंचित-बहुजन आघाडीमध्ये फूट पडली आहे. एमआयएम पक्षाने वंचितमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. जागावाटपावरून दोघांमध्ये बेबनाव झाला असून एमआयएमने विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. ‘प्रकाश आंबेडकरांनी आमचा मान राखला नाही’, अशी प्रतिक्रिया संभाजीनगरचे एमआयएम पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांनी दिल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे.

लोकसभा निवडणूक एकत्र लढलेले वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम विधानसभाही एकत्र लढतील अशी चिन्हे होती. गेल्या दोन महिन्यांपासून त्यांच्यात जागावाटपाची चर्चाही सुरू होती. मात्र वंचित आघाडीने 288 पैकी फक्त 8 जागा एमआयएमला ऑफर केल्या होत्या. जागावाटपावरून वाजल्याने एमआयएमने वंचितशी फारकत घेत स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचे ठरवले. एक पत्रक काढून संभाजीनगरचे खासदार जलील यांनी ही घोषणा केली.

वंचित आघाडीने महाराष्ट्रातील 288 जागांपैकी फक्त 8 जागा एमआएमला सोडणार असल्याचे सांगितले. मात्र हे अमान्य असल्याचे जलील म्हणाले. या संदर्भात एमआयएमचे नेते डॉ. गफ्फार कादरी यांनी 5 सप्टेंबरला, पुण्यात बाळासाहेब आंबेडकर यांचीही भेट घेतली होती. मात्र त्यांनी आठ जागांचाच मेल खासदार असदुद्दीन ओवैसी यांना धाडला. मात्र ही जागावाटप अयोग्य असल्याचे जलील म्हणाले.

2014 च्या निवडणुकीमध्ये आम्ही 24 जागांवर लढलो होतो. पैकी संभाजीनगर आणि भायखळा या दोन जागांवर आमचा उमेदवार विजयी झाला होता. तर नऊ जागांवर आमचा उमेदवार दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर राहिला होता, असेही जलील यांनी पत्रकात नमूद केले. तसेच सध्या एमआयएमचे राज्यात 150 नगरसेवक असल्याचेही त्यांनी म्हटले. तसेच संभाजीनगरात 26 नगरसेवक आमचे असून विरोधीपक्षनेताही आमचाच आहे. त्यामुळे आम्हाला वंचितची ऑफर अमान्य असून आम्ही त्यांना भविष्यासाठी शुभेच्छा देतो, असे जलील यांनी म्हटले.