
राज्य लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये सहायक मोटार वाहन निरीक्षक आणि राज्यसेवा परीक्षा उत्तीर्ण होऊन दोन वर्षे झाली. आता तरी शासनाने आम्हाला नियुक्त करून घ्यावे या मागणीसाठी निवड झालेल्या भावी अधिकाऱयांनी आज सरकारपुढे लोटांगण घालून भीक मागो आंदोलन केले. पाठोपाठ नोकरीवर रुजू करून घ्या या मागणीसाठी त्यांनी बेमुदत उपोषणदेखील सुरू केले.
राज्य लोकसेवा आयोगाने परीक्षा घेऊन उपजिल्हाधिकारी, पोलीस उपअधीक्षक, तहसीलदार यासह सहायक मोटार वाहन निरीक्षक ‘गट-अ’ आणि ‘गट-ब’ पदावरील अधिकाऱयांची निवड केली. निवड होऊन दोन वर्षे झाली तरी या अधिकाऱ्यांना शासन सेवेत अद्यापि नियुक्त्या मिळालेल्या नाहीत. समांतर आरक्षणासंदर्भातील एका खटल्याच्या प्रकरणात 90 ते 95 टक्के उमेदवारांचा संबंध नाही. अधिकाऱ्यांच्या बाजूने निकाल लागला तरीदेखील प्रशासनाकडून अधिकाऱयांना नियुक्ती मिळत नसल्याने आज त्यांनी स्टेशनजवळील महात्मा गांधी पुतळ्याला अभिवादन करून लोटांगण आंदोलनाला सुरुवात केली.
सुमारे सातशे ते आठशे भावी अधिकाऱयांनी गांधी पुतळ्यापासून विधान भवनापर्यंत येऊन सरकारला लोटांगण घालून शासन सेवेत रुजू करण्याची मागणी केली. त्यानंतर या परिसरात भीक मांगो आंदोलन करून बेमुदत उपोषणाला सुरुवात केली. यासंदर्भात रोहित पवार म्हणाले, ‘दोन वर्षे उलटली तरी अद्यापि आम्हाला नियुक्ती मिळालेली नाही. बेरोजगारीचा सामना करीत आहोत. रात्रंदिवस कठोर परिश्रम घेऊन परीक्षा उत्तीर्ण झालो. वय वाढत आहे. सामाजिक आणि मानसिक तणावाला सामोरे जावे लागत आहे. अशा वेळी सरकारने सहानुभूतीने विचार करून आम्हाला रुजू करून घ्यावे.’ अभिजित बाविस्कर यांनीदेखील व्यथा मांडली. ते म्हणाले, ‘निवड होऊनदेखील शासकीय सेवेत रुजू करून न घेतल्याने मुलांमध्ये नैराशाची भावना निर्माण झाली आहे. कौटुंबिक कलहाला सामोरे जावे लागत असल्याने अधिकाऱयांची मानसिक स्थितीदेखील बिघडत आहे. अशावेळी आंदोलनाशिवाय आमच्याकडे पर्याय नाही म्हणून हा लढा द्यावा लागत आहे.’
1202 अधिकारी प्रतीक्षेत…
राज्यसेवेत निवड झालेल्यांमध्ये सहायक मोटार वाहन निरीक्षक पदाचे 832, राज्यसेवेतील 377 जण नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. राज्यसेवेचा निकाल 16 महिन्यांपूर्वी तर मोटार वाहन निरीक्षक पदाचा निकाल 32 महिन्यांपूर्वी लागलेला आहे. भावी अधिकाऱयांच्या या आंदोलनाला शहरातील अनेक संस्था, संघटना आणि राजकीय पक्षांनीदेखील पाठिंबा दिला आहे.


























































