
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणेश चतुर्थीच्या पहिल्या दिवशीपासूनच पावसाने जोर धरला आहे. कोकणात गणेशोत्सव सण मोठ्या उत्साहात भक्तिभावाने साजरा केला जातो. गणेश चतुर्थी म्हटली की आरती, भजन अर्थात देवाचे नामस्मरण आलेच. सध्या जोरदार पाऊस असूनही या पावसावर मात करून गणेशभक्त आरती, भजनात करण्यात दंग झाले आहेत. वाडीवाडीवर टाळ, मृदूंगाचा आवाज घुमू लागला आहे. त्याचबरोबर फूगडीचीही गीते कानी पडत आहेत.
जिल्ह्यात दिड दिवसांपासून पाच, सात, नऊ, अकरा, सतरा, एकवीस व बेचाळीस दिवस गणेश पूजन केले जाते. प्रत्येकाच्या घरोघरी आरती, भजन करण्याची परंपरा आजही टिकून आहे. यावर्षी पावसाने गणेशोत्सवात हजेरी लावली आहे. तरीही गणेशभक्त, भजन मंडळे पाऊस असतानाही घरोघरी जाऊन आरती व भजनरूपी सेवा करताना दिसत आहेत. फूगडीमंडळेही गणरायासमोर फूगड्या सादर करून पारंपारिक कला जोपासत आहेत. कुडाळ तालुक्यातील पिंगुळी शेटकरवाडी येथे गेले कित्येक वर्षे घरोघरी जाऊन आरती भजनाची जोपासना केली जाते. सध्या तर जोरदार पाऊस असूनही या पावसावर मात करून हे आरती प्रेमी गणेश भक्त श्रीच्या गणेशआरती, भजन करण्यात दंग झालेले दिसून येत आहेत.
पिंगुळी गाव सांस्कृतिक चळवळीचे माहेरघर म्हणून संबोधले जाते. ठाकर समाजाची लोक कला याच गावातीलच आहे. गावातील ही लोककला संपूर्ण जगासमोर गेली आहे. अनेक कला विकसित होत असतानाच भजन, आरती या कला अनेक वर्षे येथील गणेशभक्त जोपासून ठेवत आहेत. पिंगुळी शेटकरवाडी ही पिंगुळी गावातील मोठी वाडी म्हणून ओळखली जाते. या वाडीमध्ये सुमारे 65 ते 70 गणपती घरोघरी आहेत. प्रत्येक घरांमध्ये श्री गणेशाचे आगमन हे पाच दिवसापासून ते अकरा दिवसापर्यंत असते. विशेष म्हणजे अकरा दिवसाचे गणपती मोठ्या प्रमाणात या वाडीमध्ये असतात. या वाडीचे विशेष म्हणजे गेले कित्येक वर्ष प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन आरती सादर करणे ही अनोखी प्रथा आजही टिकून ठेवली आहे. रात्री साडे आठच्या दरम्यान आरतीला सुरुवात होऊन मध्यरात्री एक ते दीड वाजेपर्यंत आरत्या सुरू असतात. गेले चार पाच दिवस गणेशोत्सवात पाऊस जोरदार सुरू असूनही या पावसावर मात करीत हे भजनी आरती प्रेमी श्रीगणेशाच्या भक्तीरसात तल्लीन झालेले दिसून येत आहेत.





























































