
मेहकर तालुक्यातील मोठा प्रकल्प असलेला पेनटाकळी प्रकल्प 92.27 टक्के भरला असून रात्रभरातील पाण्याची आवक पाहून कोणत्याही क्षणी दारे उघडावी लागतील. याकरिता पैनगंगा नदीला पूर येऊन नुकसान होऊ नये म्हणून 17 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यात दिवसभर जोरदार पाऊस पडला. मेहकर तालुक्यातील पेनटाकळी हा मोठा प्रकल्प आहे. आज तो 92.27 टक्के भरला आहे.
जिल्ह्यातील बुलढाणा जवळील येळगाव धरण शंभर टक्के भरलेले असल्याने रात्री पाऊस पडला तर येळगाव चे दरवाजे आपोआप उघडतात व ते पाणी पेनटाकळी धरणात येईल. तसेच पेनटाकळी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रातून पाण्याची आवक वाढली तर रात्रीच पेनटाकळी धरणाचे दारे उघडावी लागतील व त्यामुळे पैनगंगा नदीला पूर येण्याची शक्यता असल्याने पूरामूळे नदीकाठच्या गावांना नुकसान होऊ नये म्हणून पेनटाकळी, दूधा,ब्रह्मपुरी, रायपूर, बाऱ्हई, पाचला, भालेगाव, गौढाळा, कंबरखेड, नेमतापूर, फरदापुर, सारंगपूर, अंत्री, बोरी, सोनाटी, नांद्रा व गणपूर या गावांना सतर्क तेचा इशारा देण्यात आला आहे. सर्व परिस्थितीवर अधिकारी व कर्मचारी लक्ष ठेवून आहे, असे पेनटाकळी प्रकल्प उपविभागीय अभियंता एस.बी चौगुले यांनी सांगितले. दरम्यान उपविभागीय अधिकारी(महसूल)जयंत देशपांडे व पोलिस निरीक्षक आत्माराम प्रधान यांनीहीविभागाच्या वतीने सतर्कतेचा इशारा दिला आहे.


























































