पंचगंगेने पुन्हा पातळी ओलांडली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जिह्यात पावसाचा जोर वाढल्याने पूरस्थितीचा धोका पुन्हा धडकी भरवू लागला आहे. रविवारी चौथ्या दिवशीही नद्यांचे पाणी पात्राबाहेरच राहिले. सायंकाळी सातच्या सुमारास पंचगंगा नदीने 39 फुटांची इशारा पातळी ओलांडली असून महापुराचा धोका ओळखून शिरोळच्या 4 गावांतून 97, तर करवीरच्या एका गावातून 250 कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे. दरम्यान, 4 प्रमुख राज्य मार्गांसह 18 जिल्हा मार्ग बंद झाले आहेत.

राधानगरी धरणाच्या 4 स्वयंचलित दरवाजांमधून 7 हजार 112 क्युसेॊस विसर्ग सुरू होता. नद्यानाल्यांना आलेल्या पुरामुळे जिह्यातील 72 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. गेल्या चोवीस तासांत पंचगंगा नदीची पाणी पातळी दोन फुटांनी वाढली. सायंकाळी सात वाजता इशारा पातळी ओलांडून पंचगंगा नदी एक इंचाने अधिक वाहत होती. त्यामुळे जिह्यात पुन्हा महापुराचे संकट उभे राहतेय की काय अशी भीती सतावू लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणादेखील सतर्क झाल्या आहेत.

अलमट्टी धरणातून विसर्ग वाढला

कर्नाटकातील अलमट्टी धरणातून 50 ते 60 हजार क्युसेस विसर्ग वाढविण्यात आला आहे. सध्या या धरणातून 2 लाख 30 हजार विसर्ग सुरू आहे. कोल्हापूर जिह्यातील तुळशी-1 हजार 956, वारणा-11 हजार 894, दूधगंगा-9 हजार 500, कासारी- 1 हजार 100, पाटगाव-1 हजार 874 व कुंभी धरणातून 1 हजार 850 क्युसेस विसर्ग सुरू होता.

सांगलीत पुराचा धोका; कृष्णेच्या पातळीत वाढ

कोल्हापूरबरोबरच सांगली जिह्यातही पुन्हा पुराचा धोका निर्माण झाला आहे. कोयना व वारणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केल्याने सांगली येथे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊ लागली आहे. सांगली येथील आयर्विन पुलाच्या पाण्याची पातळी 30 फुटांवर पोहचली आहे. त्यामुळे शहरातील इनामदार प्लॉट, सूर्यवंशी प्लॉट व दत्तनगर परिसरात पूरस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे.