
मुसळधार पावसात आपले कर्तव्य बजावत असताना पालिकेच्या पी-दक्षिण विभागाचे कर्मचारी जगदीश परमार (54) आणि विजेंद्र बागडी (40) यांचा बुधवारी दुर्दैवी मृत्यू झाला. या दोन्ही कर्मचाऱयांच्या कुटुंबांतील एका वारसाला पालिकेत नोकरी मिळणार असून नुकतेच नियुक्तीचे पत्र त्यांच्या वारसांना दिले.
अतिवृष्टीदरम्यान नागरिकांच्या सुविधेसाठी महापालिकेचे 32 हजारांपेक्षा अधिक कर्मचारी अव्याहतपणे कार्यरत होते. यानुसार कार्यरत असणाऱया पी-दक्षिण विभागातील कामगार जगदीश परमार यांचे कर्तव्य बजावताना निधन झाले. तसेच पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन खात्यातील सफाई कामगार विजेंद्र बागडी हे कर्तव्यावर असताना तोल जाऊन वाहत्या पाण्यात पडून त्यांचा मृत्यू झाला होता. याबाबत महापालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी दोन्ही कर्मचाऱयांच्या कुटुंबांतील एका वारसाला पालिकेच्या सेवेत सामावून घेण्याची कार्यवाही करण्याचे आणि नियमानुसार कर्मचाऱयांची देणी देण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश संबंधित खात्याला दिले होते. त्यानुसार परमार आणि बागडी यांच्या कुटुंबातील एका वारसाला नोकरीचे नियुक्तीपत्र आणि सफाई कामगार विमा योजनेंतर्गत एक लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला.























































