
गणेशोत्सव साजरा करताना समुद्र व मिठी नदीला प्रदूषणापासून मुक्त करण्यासाठी निर्माल्यासह प्लॅस्टिक जाणार नाही याची काळजी सर्वांनी घ्यावी असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. यात स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांनी प्रबोधनासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन शालेय शिक्षणमंत्री ऍड. आशीष शेलार यांनी आज केले.
महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट गाईड संस्थेतर्फे आयोजित राज्य पुरस्कार वितरण कार्यक्रमात शेलार बोलत होते. यावेळी बोलताना शेलार म्हणाले, स्काऊट गाईडमधून चांगले नागरिक निर्माण व्हावेत यासाठी ही चळवळ आहे. ही चळवळ ध्येय ठेवून काम करीत आहे. आजचे पुरस्कार हे चांगल्या कामाची पावती आहे. देशसेवेसाठी करता येईल ते करण्याची शपथ आपण या चळवळीमध्ये घेत असतो. देशप्रेम हे संस्कार आहेत. देशसेवा करण्यासाठी सैनिकाप्रमाणे सीमेवरच जाणे आवश्यक नाही. स्काऊट गाईड हे देशात राहूनही सेवेचे व्रत पूर्ण करू शकतात. यावेळी स्काऊट गाईड राज्य संस्थेचे अध्यक्ष ज्ञानोबा मुंडे, मुख्य प्रशासक शरद उघडे, संतोष मानूरकर, कार्तिक मुंडे आदी उपस्थित होते.
n यावेळी 2016-17 या वर्षासाठी अहमदपूर लातूरचे धुंडीराज लोहारे तर सन 2017-18 या वर्षासाठी नांदेड येथील दिगंबर फुलारी यांना प्रा. बापूसाहेब टी. पी. महाले जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. तसेच स्काऊट गाईडस् अभ्यासक्रमातील राज्य पुरस्कार, स्काऊट गाईड प्रमाणपत्र, बार टू मेडल ऑफ मेरिट या पुरस्कारांचे वितरण यावेळी करण्यात आले.






























































