मुंबई गोवा महामार्ग खड्ड्यात, चौपदरीकरण ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे चाकरमान्यांचे हाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई गोवा महामार्गावर पडलेले खड्डे चौपदरीकरणाच्या ठेकेदाराने योग्य प्रकारे न भरल्याने महामार्ग पुन्हा एकदा खड्ड्यात गेला आहे. ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे गणेशोत्सवांसाठी आलेल्या चाकरमान्यांना परतीच्या प्रवासही ठेचकळत करावा लागतो आहे. गणेशोत्सवांदरम्यान महामार्गावर खड्डे भरणारी सारी यंत्रणा तैनात असेल अशी घोषणा कशेडी ते परशुराम घाट दरम्यानच्या महामार्गाचे चौपदरीकरण करणाऱ्या कल्याण टोलवेज या ठेकेदार कंपनीने केली होती. मात्र सद्य स्थितीत महामार्गावर पडलेले खड्डे पाहता ठेकेदार कंपनीचा खोटारडेपणा स्पष्ट झाल्याशिवाय राहत नाही.

गणेशोत्सवां दरम्यान महामार्गावर खड्डे पडणे हे काही नवीन नाही. गणेशोत्सवांसाठी येणाऱ्या चाकरमान्यांना दरवर्षी याच दिव्यातून जावे लागते. मात्र महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरु झाल्यापासून महामार्ग अधिकच खड्ड्यात गेला असल्याने महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे कंबरडे मोडू लागले आहे. महामार्ग चौपदरीकरणाचे काम पूर्ण होई प्रयन्त महामार्गाच्या डागडुजीचे काम संबधीत ठेकेदाराने करायचे आहे. या नियमानुसार कशेडी ते परशुराम घाटादरम्यान रस्त्यावर पडलेले खड्डे कल्याण टोलवेज या कंपनीने भरलेले खड्डे केवळ भरायचे म्हणून भरल्याने दोन दिवसातच भरलेले खड्डे उखडले आणि खड्डे चुकविताना प्रवाशांची होणारी दमछाक तशीच राहिली.

कशेडी ते परशुराम घाट या दरम्यान असलेल्या भोस्ते घाटाची अवस्था अतिशय दयनीय आहे. घाटात ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असल्याने घाटात गाडी हाकणे म्हणजे अपघाताला आमंत्रण देण्यासारखे आहे. खड्डे रस्त्यात की रस्ता खड्ड्यात हेच कळेनासे झाले असल्याने खड्डे चुकविताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. जगबुडी नदीवरील नवा पूल हलक्या वाहनांसाठी सुरु करण्यात आला असला तरी अवजड वाहनांची वाहतूक जुन्या धोकादायक झालेल्या पुलावरूनच सुरु आहे. या पुलावर आता ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असल्याने जाड वाहने हाकताना वाहन चालकांच्या पोटात गोळा येत आहे. अधिक धोकादायक झालेल्या जगबुडी जुन्या पुलावरील खड्डे चुकविताना एखादा अपघात झाला तर त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न संबंधीत ठेकेदाराला विचारण्याची वेळ आली आहे.

भरणे पुलापासून वेरळपर्यंतचा रस्ताही खड्ड्यात गेला आहे. मध्यतंरी पावसाने उघडीप दिली तेव्हा ठेकेदार कंपनीने रस्त्यावर पडलेल्या खड्डे बुजविण्याचा फार्स केला मात्र कामाचा दर्जा राखला पाहिजे हे कंपनीच्या हिशोबातच बसत नसल्याने दोन दिवसात बुजवले खड्डे पुन्हा उखडले आणि कंपनीचे कामाच्या दर्जाबाबतचे पितळ उघडे पडले.