
पाथर्डीजवळील रुपल्याचा तांडा येथील शाळेतील 14 विद्यार्थ्यांनी विलायतीच्या बिया खाल्यामुळे त्यांना विषबाधा झाली. या सर्व विद्यार्थ्यांना पाथर्डी येथील उपजिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
तालुक्यातील आल्हणवाडी केंद्रातंर्गत रुपल्याचा तांडा येत असून येथील जिल्हा परिषदेत प्राथमिक शाळेत शिकणारे विद्यार्थी दुपारी चारच्या सुमारास सुट्टी झाल्यानंतर मैदानावर खेळण्यासाठी गेले. या वेळी मैदानावर पडलेल्या विलायतीच्या बिया त्यांनी खाल्ल्या. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना चक्कर येत होत्या. त्यामुळे ते जमिनीवरच पडून होते. हा प्रकार या शाळेतील शिक्षकांच्या लक्षात आल्याने त्यांनी व पालकांनी सर्व विद्यार्थ्यांना पाथर्डी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या विद्यार्थ्यांवर डॉ. विनोद गर्जे व डॉ. मंगेश राऊत यांनी उपचार केले असून सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे. नीलाक्षी जाधव,अवंतिका राठोड,गौरी राठोड,विद्या राठोड,कार्तिक जाधव,प्रणाली राठोड,अनु राठोड,देविका वाघमारे,रोशनी वाघमारे,राणी वाघमारे,रोहन राठोड,आकाश धनगर,विकास धनगर,प्रांजली राठोड या विद्यर्थ्यांना विषबाधा झाली आहे.
























































