
रोहा तालुक्यातील दिव गावातील शासकीय खाजण जमीन घोटाळा प्रकरणी मंडळ अधिकारी परशुराम लहाने यांच्यावरही निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे. याआधी नायब तहसीलदार सिराज तुळवे यांच्यावर निलंबनाची कारवाई कोकण आयुक्तांनी केली आहे. शासकीय जमीन घोटाळ्याची व्याप्ती मोठी असताना खातेनिहाय चौकशी करण्यात येत आहे. मात्र दोषी अधिकाऱ्याबाबत अद्यापही महसूल यंत्रणेकडून पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आलेली नाही. त्यामुळे चौकशीचा फार्स करण्याचा प्रयत्न सुरू आहे का असा प्रश्न निर्माण होत आहे.
रोहा तालुक्यातील दिव गावातील खाडीलगत असलेली 342 एकर शासकीय खाजण जमीन दलालांनी महसूल अधिकाऱ्यांना हाताशी धरून परस्पर गुंतवणूक दारांना करोडो रुपयाला विकून आर्थिक घोटाळा केला. या प्रकरणात गावातील शेतकऱ्यांनाही फसविण्यात आले. याबाबत सर्वहारा जन आंदोलनाच्या नेत्या उल्का महाजन यांनी आवाज उठविला. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी कारवाईचे आश्वासन देऊन सिराज तुळवे यांच्यावर निलंबनाची कारवाईचा प्रस्ताव कोकण आयुक्त यांच्याकडे पाठविला होता. त्यानुसार तुळवे यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली आहे.
दिव जमीन घोटाळ्यात महसूल अधिकारी, कर्मचारी हे अडकले असून त्याच्यावर खातेनिहाय चौकशी सुरू झाली आहे. तुळवे नंतर मंडळ अधिकारी परशुराम लहाने यांचेही निलंबन झाले आहे. त्यामुळे या प्रकरणात अजून किती जणांचे निलंबन होणार आहे हे लवकरच कळणार आहे. मात्र या प्रकरणात महसूल अधिकाऱ्यांसह दुय्यम निबंधक अधिकारी, कर्मचारी यांचाही हात असून त्याच्याबाबत अजून कोणतीही कारवाईची पावले उचलताना दिसत नाही. ज्या दलालांनी हा व्यवहार घडवून आणला आहे ते सुद्धा राजरोसपणे फिरत आहेत. महसूल अधिकारी, कर्मचारी यांची खातेनिहा चौकशी सुरू असून दोन जण निलंबित झाले आहेत. मात्र या प्रकरणाची खोली जास्त असूनही दोषी अधिकाऱ्यावर अद्यापही पोलीस ठाण्यात तक्रार महसूल विभागाकडून दाखल करण्यात आलेली नाही. असा सवाल उल्का महाजन यांनी केला आहे. दिव शासकीय जमीन घोटाळा प्रकरणात दोषी असणाऱ्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल अशी ग्वाही पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे.




























































