
>> वर्णिका काकडे
नावीन्यपूर्ण कल्पनेच्या जोरावर आणि तंत्रज्ञानावर आधारित नवोद्योग सुरू करणाऱया आणि यशाची मुहूर्तमेढ उभी केलेल्या तरुणांना विविध चित्रवाहिन्यांच्या माध्यमातून ‘द सुरेश हावरे स्टार्टअप शो’द्वारे जगासमोर आणल्यानंतर त्या शोवर आधारित असंख्य तरुणांना उद्योग करण्यासाठी मार्गदर्शक ठरेल असे ‘स्टार्टअप मंत्र’ हे पुस्तक आता उपलब्ध झालेले आहे. नवोद्योग करण्यासाठी काय आवश्यक आहे, कोणती तत्त्वे पाळावी लागतात याची विस्तृत माहिती स्टार्टअप उद्योजकांकडून भावी उद्योजकांना देण्याचा पुरेपूर प्रयत्न डॉ. सुरेश हावरे यांनी या पुस्तकातून केला आहे.
शिक्षणाने वैज्ञानिक असलेले व अणुऊर्जा विभागात वरिष्ठ अणुशास्त्र्ाज्ञ म्हणून देशसेवा केलेले डॉ. सुरेश हावरे हे स्वतः एक यशस्वी उद्योजक आहेत. अथक परिश्रमाने त्यांनी स्वतःचे असे उद्योग विश्व निर्माण केले आहे. आपल्या अनुभवाची शिदोरी त्यांनी यापूर्वीही नवोद्योजकांवर विविध व्यवसायविषयक कार्यक्रम, टीव्ही शो आणि पुस्तकांच्या माध्यमातून रिती केलेली आहे. त्याचे ‘उद्योग तुमचा, पैसा दुसऱयाचा’ हे बहुचर्चित पुस्तक वाचकांच्या चांगल्याच पसंतीस उतरले होते. जास्तीत जास्त तरुणांनी उद्योगाकडे वळावे हीच यामागची भावना आहे.
‘स्टार्टअप मंत्र’ या पुस्तकातून मुलाखतीच्या माध्यमातून त्यांनी 15 स्टार्टअप उद्योजकांना विविध प्रश्न विचारून त्यांचे भावविश्व उलगडून त्यांना सुचलेल्या संकल्पना, संकल्पनेचे उद्योगात केलेले रूपांतर, उद्योगासाठी उभे केलेले भांडवल, त्यांनी तयार केलेले ऍप, उत्पादनाची मार्केटिंग आदी याची विस्तृत स्वरूपात माहिती वाचकांसमोर ठेवली आहे, जी वाचकांना आणि नवोद्योजक होऊ पाहणाऱया प्रत्येकाला उपयोगी ठरेल. नवोद्योगातील सुप्रसिद्ध जेनकोवॅल ग्रुप ऑफ कंपनीचे चेअरमन दीपक घैसास यांनी या पुस्तकाला प्रस्तावना दिली आहे.
स्टार्टअपसाठी नवोद्योजकांना जशी नवीन संकल्पनेची गरज असते तशीच योग्य मार्गदर्शनाचीही गरज असते. त्यासाठी ‘स्टार्टअप मंत्र’ हे पुस्तक दिशादर्शक ठरेल एवढे मात्र नक्की.
स्टार्टअप मंत्र
लेखक – डॉ. सुरेश हावरे
प्रकाशक – रोहन प्रकाशन
पृष्ठ – 116, मूल्य ः 100 रुपये





























































