
मध्य प्रदेशात काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शिस्त धुडकावून लावत गोंधळ घातला आहे. काँग्रेसचे माजी राष्ट्रीय महासचिव ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या कार्यक्रमात रविवारी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड गोंधळ घातला. कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली. तसेच बेभान होऊन ते एकमेकांवर खुर्च्या फेकत होते. या गोंधळामुळे नाराज झालेले सिंधिया कार्यक्रम अर्ध्यावरच सोडून निघून गेले.
सिंधिया एक दिवसाच्या दौऱ्यासाठी इंदूरमध्ये आले होते. पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी रंगून गार्डनमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सिंधिया कार्यक्रमस्थळी पोहचल्यावर त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. मात्र, ज्यावेळी सिंधिया व्यासपीठावर उपस्थित होते, तेव्हा व्यासपीठावर चढून त्यांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये हमरी-तुमरी सुरू झाली. त्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली. बेभान झालेले कार्यकर्ते एकमेकांवर खुर्च्या फेकू लागले. त्यात अनेक खुर्च्या तुटल्या असून काही कार्यकर्ते जखमी झाले आहेत. कार्यकर्त्यांच्या गोंधळामुळे नाराज झालेले सिंधिया कार्यक्रम अर्ध्यावरच सोडून निघून गेले.
मध्य प्रदेशात आपल्या नेत्याला नेतृत्व मिळावे, यासाठी गटबाजी जोरात सुरू आहे. काही दिवसांपूर्वी सिंधिया यांच्या समर्थकांनी भोपाळमधील पक्ष कार्यालयासमोर निदर्शने केली होती. सिंधिया यांना प्रदेश अध्यक्ष बनवण्यात यावे, अशी मागणी होत आहे. काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी पक्षाच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेत राजीनाम्याचा प्रस्ताव दिल्याची चर्चा आहे. त्यामुळे प्रदेश अध्यक्षपद आणि नेतृत्व आपल्या नेत्याला मिळावे, यासाठी चढाओढ लागली आहे. मात्र, बेभान झालेल्या कार्यकर्त्यांनी शिस्त धुडकावून लावत सिंधिया यांच्यासमोरच गोंधळ घातला आहे. त्यामुळे या कार्यक्रमातील गोंधळ चर्चेचा विषय ठरला आहे.
























































