दिवाळीत वाजणार विजयाचे फटाके, आचारसंहिता 19 पासून

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राजकारणातील ‘घड्याळा’चे एकेक काटे निखळत चालले असले तरी खऱ्या घड्याळाचे काटे मात्र पुढे पुढे सरकत आहेत आणि राजकारणातील धडधड वाढत आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कधी लागू होणार किंवा कधीही लागू होईल या शक्यतेने एकीकडे राजकीय पळापळ सुरू असतानाच दुसरीकडे प्रशासकीय बैठकांचाही धडाका सुरू आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाचे तिन्ही आयुक्त मंगळवारी मुंबईत दाखल होत असल्याने गुरुवार 19 पासूनच आचारसंहिता लागू होईल, अशी दाट शक्यता आहे. आणि हे गणित जमले तर यंदाच्या दिवाळीत विजयाचे फटाके फुटणार हे नक्की झाले आहे.

राज्यातील राजकारण गेले काही दिवस धावपळीचेच ठरले आहेत. शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचा झंझावात, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा आणि शिवसेना-भाजपमध्ये होणारे प्रवेशसोहळे यामुळे अवघे राजकारण ढवळून निघाले आहे. राजकीय हालचालींचा असा धुरळा उडत असताना मंत्रालय, पोलीस आयुक्तालय, जिल्हाधिकारी कार्यालय आणि निवडणूक आयोग कार्यालयातही बैठकांचे सत्र सुरू आहे. त्यामुळे आचारसंहिता कधी लागू होणार याचीच चर्चा आज दिवसभर सुरू होती.

मंत्रिमंडळाची बैठक नाही
राज्य मंत्रिमंडळाची साप्ताहिक बैठक दर मंगळवारी होते. उद्या मात्र ती होणार नाही. गेल्या आठवडय़ातील बैठक ही अखेरची होती हे तेव्हाच स्पष्ट झाले होते. कारण त्या बैठकीत तब्बल 37 निर्णय घेताना मुख्यमंत्र्यांनी सहकारी मंत्र्यांच्या आभाराचे भाषणही केले होते. उद्या बैठक होणार नसल्याने उद्याच आचारसंहिता लागू होईल या चर्चेने आज मंत्रालयात अधिकच जोर धरला होता.

आयुक्त मंगळवारी मुंबईत
केंद्रीय निवडणूक आयोगाचे तिन्ही आयुक्त उद्या मंगळवारी संध्याकाळी मुंबईत दाखल होणार आहेत. त्यानंतर ते राज्य निवडणूक आयोगाच्या वरिष्ठांसह सर्व संबंधित यंत्रणांच्या प्रमुखांशी बुधवारी सकाळी ‘सहय़ाद्री’ अतिथीगृहावर बैठक घेतील आणि नंतर ते नवी दिल्लीस रवाना होतील असे खात्रीशीररीत्या समजते. या माहितीच्या आधारे बुधवारपर्यंत तरी आचारसंहिता लागू होणार नाही असे काही अधिकाऱयांनी ठामपणे सांगितले. निवडणुकीच्या तयारीची माहिती घेतल्यानंतर आयुक्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशीही चर्चा करणार आहेत.

दिवसभर चर्चा ‘बुधवार’चीच!
सरकारी खात्यांच्या बैठकांचा सपाटा आणि रद्द झालेली मंत्रिमंडळाची बैठक याचा हवाला देत सोमवार दिवसभर आचारसंहिता बुधवारपासून लागू होईल अशी चर्चा सुरू होती. भाजप प्रदेश कार्यालयातील सूत्रांनीही तशीच माहिती दिली. त्यामुळे या चर्चेला जणू आधारच मिळाला.

मोदींची सभा ठरल्यानुसारच
मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचा 19 सप्टेंबर रोजी नाशिकमध्ये समारोप होणार आहे. या समारोपाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार असून या सभेनंतरच राज्यात निवडणूक आचारसंहिता लागू होईल असे सांगण्यात येते. मात्र त्यापूर्वी आचारसंहिता लागू झाली तर मोदी यांच्या जाहीर सभेवर काहीही परिणाम होणार नाही. सभेचा खर्च निवडणुकीच्या खर्चात समाविष्ट केला जाईल. आचारसंहितेमुळे सभा रद्द होणार नाही, तर मोदींची ती पहिली प्रचारसभा ठरेल असे भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले.

दिवाळीपूर्वी मतदान, मतमोजणी
महाराष्ट्र, हरयाणा आणि झारखंड या तिन्ही राज्यांतील विधानसभा निवडणुका एकत्रच होणार आहेत. महाराष्ट्राच्या विधानसभेची मुदत 9 नोव्हेंबरला संपत असली तरी हरयाणाची मुदत मात्र 2 नोव्हेंबरला संपणार आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वी मतदान घेऊन दिवाळीनंतर मतमोजणी घ्यावी असा एक मतप्रवाह निवडणूक आयोगात होता. अर्थात ऐन दिवाळीत सुरक्षा व्यवस्थेवर ताण नको म्हणून हे मत विचारात घेण्यात आलेले नाही. म्हणूनच दिवाळीआधीच मतदान व मतमोजणी होईल असे सांगण्यात येते.